तेहरान/तेल अवीव : इस्त्रायलने गाझा पट्टीत हमासविरुद्ध तर लेबॅनॉनमध्ये रणगाडे घुसवून हिजबुल्लाविरुद्ध युध्द सुरू केले असताना इराणने इस्त्रायलवर १८० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागले. त्यानंतर इराणलाही कडू धडा शिकवण्याचा निर्धार इस्त्रायलने व्यक्त केला आहे. दुसरीकडे इराणला आपल्या कृत्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असे म्हणत अमेरिकेनेही इस्त्रायलला संपूर्ण पाठिंबा राहील असे जाहीर केले. त्यामुळे रशिया - युक्रेन युद्धानंतर आता मध्य-पूर्वेतील युद्ध चिघळण्याची चिन्हे दिसू लागल्याने जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची चर्चा तज्ज्ञांमध्ये सुरू झाली आहे.
लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागात इस्त्रायलने सैन्य घुसवल्यानंतर त्यांची हिजबुल्लाहशी जोरदार चकमक सुरू झाली आहे. जमिनीवरील या युद्धात बुधवारी इस्त्रायली सैन्य ‘मरून अल-रस’ गावाच्या दोन किमी. आत पोहोचले आहे. समोरासमोर झालेल्या या लढाईत आतापर्यंत २ इस्रायली सैनिक ठार झाले असून, १८ जण जखमी झाले आहेत. पेजर हल्ला, वॉकी-टॉकी हल्ला आणि हवाई हल्ल्यानंतर आता इस्त्रायलने हिजबुल्लाविरोधात जमिनीवरील कारवाई सुरू केली आहे.
संयुक्त राष्ट्रप्रमुखांना इस्त्रायलमध्ये येण्यास बंदी
इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांना इस्रायलमध्ये येण्यास बंदी घातली आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी इराणच्या हल्ल्याचा निषेध केला नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
इराणने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्याचा लवकरच बदला घेण्यात येईल. इराणने हल्ला करून मोठी चूक केली आहे, असे इस्त्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यानाहू यांनी सांगितले. दरम्यान, इस्त्रायलवर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर इराणमध्ये जनतेने रस्त्यावर उतरून आनंद व्यक्त केला.
इराणने इस्त्रायलवर १८० क्षेपणास्त्रे डागली
इस्रायल एकाचवेळी लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह, गाझामध्ये हमास, इराण आणि येमेनमध्ये हुथीशी लढत आहे. मंगळवारी रात्री इराणने इस्रायलवर १८० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इस्त्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) सांगितले की, मोसाद मुख्यालय, नेवाटीम एअर बेस आणि टेल नोफ एअर बेसला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. मात्र, इराणची बहुतेक क्षेपणास्त्रे इस्रायलच्या हवाई संरक्षण कवच यंत्रणेने नष्ट केली.
इस्त्रायलच्या पाठिशी अमेरिका
इराणची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकन व इस्त्रायली लष्कराची प्रशंसा केली व सांगितले की, अमेरिकेचा इस्त्रायलला संपूर्ण पाठिंबा राहील. इराणला आपल्या कृत्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.