वॉर्नरचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा

वॉर्नर हा २०१५ व २०२३च्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. त्याने २०२३मध्ये ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या
वॉर्नरचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने सोमवारी एकदिवसीय प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. मात्र संघाला गरज भासली, तर २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपण पुन्हा परतू, असेही ३७ वर्षीय वॉर्नरने सांगितले.

वॉर्नर सध्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत असून ३ जानेवारीपासून सिडनी येथे रंगणारी तिसरी कसोटी त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. गेल्या वर्षीच वॉर्नरने घरच्या मैदानात अखेरचा सामना खेळून निवृत्ती पत्करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता एकदिवसीय प्रकारातून निवृत्ती घेत टी-२० प्रकारावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे वॉर्नरने ठरवले आहे. तसेच जगभरात होणाऱ्या विविध फ्रँचायझी लीगमध्ये सहभागी होण्याला तो प्राधान्य देणार आहे. वॉर्नर टी-२० प्रकारात खेळत राहणार असला तरी नोव्हेंबर २०२२नंतर तो ऑस्ट्रेलियासाठी एकही टी-२० सामना खेळलेला नाही. त्यामुळे जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी त्याचा विचार करण्यात येणार की नाही, हे पाहणे रंजक ठरेल. २०२५मध्ये पाकिस्तान येथे एकदिवसीय प्रकारात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे.

वॉर्नर हा २०१५ व २०२३च्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. त्याने २०२३मध्ये ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या. कांगारूंसाठी एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो सहाव्या, तर सर्वाधिक शतके झळकावणाऱ्यांच्या यादीत तो रिकी पाँटिंगनंतर दुसऱ्या स्थानी आहे. आयपीएलमध्ये वॉर्नर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो.

मी एकदिवसीय प्रकारातूनही निवृत्त होत आहे. नोव्हेंबर २०२३मध्ये भारताविरुद्ध खेळलेला विश्वचषकातील अंतिम सामना माझा अखेरचा एकदिवसीय सामना होता. भारतात एकदिवसीय विश्वचषक जिंकणे गौरवास्पद होते. टी-२० प्रकारात मी ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करत राहणार आहे.

- डेव्हिड वॉर्न

एकदिवसीय कारकीर्द

पदार्पण : २००९ वि. दक्षिण आफ्रिका

अखेरचा सामना : २०२३ वि. भारत

सामने : १६१

धावा : ६,९३२

सरासरी : ४५.३०

अर्धशतके : ३३

शतके : २२

विश्वचषक : २०१५, २०२३

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in