जगातील ५ फूट ११ इंच इतकी मोठी बाटली असलेल्या व्हिस्कीची बोली १५ कोटींपलिकडे जाण्याची शक्यता

 जगातील ५ फूट ११ इंच इतकी मोठी बाटली असलेल्या व्हिस्कीची बोली १५ कोटींपलिकडे जाण्याची शक्यता
Published on

आतापर्यंत तुम्ही कितपत महागड्या व्हिस्कीची चव चाखली आहे. ही किंमत हजारांमध्ये किंवा फार तर लाखांच्या घरात असेल. पण जगातील ५ फूट ११ इंच इतकी सर्वात मोठी बाटली असलेल्या व्हिस्कीची बोली १५ कोटींपलिकडे जाण्याची शक्यता आहे. या व्हिस्कीच्या बाटलीचा लिलाव ब्रिटनमध्ये २५ मे रोजी होणार आहे. यापूर्वी एका बाटलीसाठी १४.५० कोटी रुपयांची (१.९ दशलक्ष डॉलर्स) बोली लागली होती. पण यावेळी हा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे.

मॅकॅलन कंपनीची ‘द इंट्रेपिड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ३२ वर्षे जुनी आणि ३११ लीटर स्कॉच व्हिस्कीच्या लिलावाकडे तमाम मद्यप्रेमींचे लक्ष लागले असून हा लिलाव एडिनबर्गमधील लिओन आणि टर्नबुल ही संस्था करेल. या ५ फूटांच्या एका बाटलीत ४४४ बाटल्या सहज मावू शकतात.

वेल्स ऑनलाइन या संकेतस्थळाच्या मते, मॅकॅलनची ही बाटली आतापर्यंतचा सर्वाधिक रकमेचा विक्रम मोडू शकते. मात्र मिळालेल्या रकमेमधून २५ टक्के रक्कम ‘मेरी क्युरी’ या धर्मादाय संस्थेला दान केली जाईल.

‘द इंट्रेपिड’ स्कॉचची वैशिष्ट्ये

मॅकॅलन कंपनीची ‘द इंट्रेपिड’ नावाची ही व्हिस्की ३२ वर्षांपूर्वी मॅकॅलनच्या स्पेसाइड वेअरहाऊसमध्ये दोन पिंपांमध्ये बनवण्यात आली होती. त्यानंतर ‘डंकन टेलर स्कॉच’ची बाटली बनवणाऱ्या कंपनीने गेल्या वर्षी ‘द इंट्रेपिड’ची बाटली बनवली होती. ही स्कॉट विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आली असून त्यात पांढरी मिरी आणि फ्रेंच सफरचंदाचा वापर करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in