जग युद्धाच्या तोंडावर, पुढील ५ वर्षे महाकठीण; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे मत

जग युद्धाच्या तोंडावर उभे असून, पुढील ५ ते १० वर्षे महाकठीण असतील, असे मत केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे.
जग युद्धाच्या तोंडावर, पुढील ५ वर्षे महाकठीण; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे मत
संग्रहित फोटो
Published on

नवी दिल्ली : जग युद्धाच्या तोंडावर उभे असून, पुढील ५ ते १० वर्षे महाकठीण असतील, असे मत केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे.

जगभरच्या घटनांकडे तुम्ही भविष्याच्या दृष्टीने कसे पाहता या प्रश्नावर ते म्हणाले की, युक्रेन-रशिया युद्ध अडीच वर्षांपासून सुरू आहे. तसेच मध्य-पूर्व, दक्षिण-पूर्व आशियातील सैन्य तणाव, आर्थिक आव्हाने व हवामान बदलांच्या घटना धोकादायक आहेत. त्यामुळे पुढील पाच किंवा दहा वर्षे अत्यंत आव्हानात्मक असतील. तरीही मी आशावादी व्यक्ती आहे. मी समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतो. आपण सर्वच जण कठीण परिस्थितीतून जात आहोत, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, पुढील पाच वर्षे आपल्यासाठी खूपच समस्यापूर्ण असतील. कारण मध्य-पूर्व, युक्रेन, दक्षिण-पूर्व व पूर्व आशियात ज्या घटना घडत आहेत, त्या आपण पाहत आहोत. कोविडचा प्रकोप अजूनही कायम आहे. कोरोनाच्या भयानक काळातून आपण सुरक्षित बाहेर पडलो आहोत. आता आपण त्याला क्षुल्लक समजत आहोत, असे त्यांनी सांगितले.

जगात आर्थिक आव्हानांचा मुकाबला अनेक देश करत असून, त्यापेक्षा अधिक देश संघर्ष करत आहेत. व्यापार कठीण होत आहे. परदेशी चलन कमी होऊ लागले आहे. लाल समुद्रातील हिंसाचार व हवामान बदल आदी घटना केवळ बातम्या राहिलेल्या नाहीत. त्याचे परिणाम जागतिक स्तरावर विध्वंस घडवत आहेत, असे जयशंकर म्हणाले.

अमेरिकन निवडणुकीबाबत भाष्य करण्यास नकार देताना ते म्हणाले की, अन्य देशातील निवडणुकींवर आम्ही भाष्य करत नाही. अमेरिकेने आपला निर्णय घ्यावा. गेल्या २० वर्षांच्या अनुभवाने सांगतो, अमेरिकेच्या कोणत्याही नवीन राष्ट्रध्यक्षांसोबत आम्ही काम करू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in