तैवान मुद्द्यावरून संघर्ष होईल; जिनपिंग यांचा ट्रम्प यांना इशारा

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गुरुवारी इराण युद्ध, ऊर्जा सुरक्षा आणि व्यापार या विषयांवर व्यापक चर्चा झाली.
तैवान मुद्द्यावरून संघर्ष होईल; जिनपिंग यांचा ट्रम्प यांना इशारा
तैवान मुद्द्यावरून संघर्ष होईल; जिनपिंग यांचा ट्रम्प यांना इशारा(संग्रहित छायाचित्र FPJ)
Published on

बीजिंग : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गुरुवारी इराण युद्ध, ऊर्जा सुरक्षा आणि व्यापार या विषयांवर व्यापक चर्चा झाली. तैवानचा मुद्दा योग्य पद्धतीने न हाताळल्यास दोन्ही देशांमध्ये वाद आणि संघर्ष भडकू शकतो, असा इशारा जिनपिंग यांनी ट्रम्प यांना यावेळी दिला.

ट्रम्प आणि जिनपिंग यांनी आर्थिक सहकार्य वाढवणे आणि इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्यावर चर्चा केली. चिनी उद्योगांमध्ये अमेरिकन गुंतवणूक वाढवणे आणि अमेरिकन व्यवसायांसाठी चीनमध्ये बाजारपेठ खुली करणे यावरही चर्चा झाली. इराणला कधीही अण्वस्त्रे मिळू दिली जाणार नाहीत, यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीला टोल आकारण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला चीनचा विरोध असल्याचे जिनपिंग यांनी स्पष्ट केले. तसेच चीनने भविष्यात अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.

जिनपिंग महान नेते

यापूर्वी ट्रम्प यांनी जिनपिंग यांचा 'महान नेते' असा उल्लेख करत ही बैठक आजवरची सर्वात मोठी शिखर परिषद असल्याचे म्हटले होते. ट्रम्प यांच्यासोबत 'एनव्हिडिया'चे जेन्सन हुआंग, 'ॲपल'चे प्रमुख टिम कूक, 'टेस्ला' आणि 'स्पेसएक्स'चे प्रमुख इलॉन मस्क आणि 'ब्लॅकरॉक'चे मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी फिंक यांसारखे दिग्गज अमेरिकन उद्योगपती उपस्थित होते. अमेरिकेच्या अध्यक्षांचा नऊ वर्षांतील हा पहिलाच चीन दौरा आहे.

logo
marathi.freepressjournal.in