ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

अखेरच्या क्षणी भारताचे ग्रँड मुफ्ती आणि प्रमुख सुन्नी नेते कंठापुरम ए. पी. अबूबकर मुसलियार यांच्या प्रयत्नांमुळे फाशीला स्थगिती मिळाली.
ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित
Published on

येमेनच्या सरकारने केरळची परिचारिका निमिषा प्रिया हिला येमेनी नागरिक तलाल अब्दो महदी याच्या खूनप्रकरणात तुर्तास मोठा दिलासा दिलाय. येमेन सरकारकडून निमिषा प्रियाला सुनावलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे. उद्या अर्थात १६ जुलै रोजी प्रियाला फाशी देण्यात येणार होती. मात्र, अखेरच्या क्षणी भारताचे ग्रँड मुफ्ती आणि प्रमुख सुन्नी नेते कंठापुरम ए. पी. अबूबकर मुसलियार यांच्या प्रयत्नांमुळे फाशीला स्थगिती मिळाली. 'द हिंदू'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मुसलियार यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली माहिती

या वृत्तानुसार, अबूबकर मुसलियार यांनी केलेल्या विनंतीनंतर येमेनमधील प्रख्यात इस्लामी विद्वान शेख हबीब उमर बिन हाफिज यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर तेथील सरकारने फाशीची शिक्षा थांबवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (१५ जुलै २०२५) दुपारी २.२० वाजता अबूबकर मुसलियार यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली की, येमेन सरकारने निमिषा प्रिया यांची फाशी स्थगित केली आहे. त्यांनी येमेन सरकारचा अधिकृत आदेश अरबी भाषेत त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. यामध्ये मुस्लीअर यांनी, निमिषा प्रियासाठी प्रार्थना केलेल्या सर्वांचा आभार देखील मानलेत.

मुसलियार यांच्या हस्तक्षेपानंतर काय झालं?

रविवारी अबूबकर मुसलियार यांनी शेवटच्या क्षणी केलेल्या हस्तक्षेपामुळे आशेचा किरण निर्माण झाला होता. कारण निमिषा प्रिया यांना दिलासा मिळावा यासाठी केलेले इतर सर्व प्रयत्न अपयशी ठरले होते. काही राजकारण्यांनी मध्यस्थीचे आवाहन केल्यानंतर त्यांनी हस्तक्षेप केला आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

अखेर चर्चा झाली सुरू

मुसलियार यांच्या विनंतीनंतर हाफिज यांनी त्यांच्या भावाच्या मुलाला हबीब अब्दुरहमान अली मशहूर यांना महदीच्या कुटुंबाशी चर्चा करण्यास सांगितले होते. मशहूर यांनी महदीच्या भावाशी अनेकदा चर्चा केली. हाफिज यांच्या विनंतीवरून हुदैदाह राज्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि येमेन शूरा परिषदेचे सदस्य देखील चर्चेत सहभागी होते.

महदीचे कुटुंब निमिषा प्रियाला माफ करणार?

मुसलियार यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये झालेल्या महदीच्या खुनाचा परिणाम केवळ त्यांच्या कुटुंबावरच नाही, तर यमेनमधील धमार येथील संपूर्ण समुदायावर भावनिकदृष्ट्या खोलवर झाला होता. “यामुळेच आजपर्यंत त्यांच्या कुटुंबातील कोणीही चर्चेसाठी तयार नव्हते” असे अबूबकर मुसलियार यांच्या एका सहकाऱ्याने सांगितले. महदी यांचे कुटुंबीय हाफिज यांची विनंती नाकारू शकले नाही. “येमेनमधील लोकांमध्ये शेख हबीब उमर यांच्याबद्दल अपार आदर आहे. त्यामुळेच महदीचे कुटुंब निमिषा प्रिया यांना माफ करेल अशी आम्हा सर्वांना आशा आहे,” असे त्यांनी नमूद केले.

पुढे काय होणार?

अन्य काही माध्यमांतील वृत्तानुसार, खून झालेल्या तलाल अब्दो महदी आणि प्रियाच्या कुटुंबामध्ये पहिल्यांदाच 'ब्लड मनी'बाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. कुटुंबाला १ मिलियन अमेरिकन डॉलर्स (सुमारे ८.५ कोटी रुपये) देऊ करण्यात आले आहेत. पण, अद्यापही त्या कुटुंबाने माफी किंवा ब्लड मनी स्वीकारण्यास सहमती दर्शवलेली नाही. शरिया कायद्यात आरोपीला माफ करण्याच्या बदल्यात ब्लड मनी म्हणून पैसे देण्याची तरतूद आहे.

दरम्यान, निमिषाला वाचवण्यासाठी खासगी चॅनल्सच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, पण एका टप्प्यापर्यंतच भारत सरकार जाऊ शकते, येमेन जगातील इतर कुठल्या भागाप्रमाणे नाही. सार्वजनिक पद्धतीने जाऊन आम्हाला परिस्थिती अजून किचकट बनवायची नसल्यामुळे आम्ही खासगी पातळीवर प्रयत्न करत आहोत, नमूद करीत केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात या परिचारिकेची फाशी थांबवण्यासाठी फार काही केले जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले होते.

काय आहे प्रकरण?

केरळच्या पलक्कड येथील रहिवासी असलेली १९ वर्षीय निमिषा प्रिया २००८ मध्ये नोकरीसाठी येमेनला गेली होती. काही वर्षांनंतर तिने क्लिनिक उघडण्यासाठी महदीची मदत घेतली. पण कालांतराने त्याने तिचा छळ केला आणि पासपोर्ट जप्त केला. निमिषाने महदीवर अनेक वेळा शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही केला. अखेर जुलै २०१७ मध्ये, महदीकडून पासपोर्ट मिळवण्यासाठी निमिषाने औषधांचे इंजेक्शन दिले. परंतु ओव्हरडोजमुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अन्य एका नर्सच्या मदतीने तिने महदीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते पाण्याच्या टाकीत फेकून दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in