न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर शुल्क लावणे ही “योग्य कल्पना” असल्याचे मत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केले आहे. मात्र, त्यांनी भारताचे नाव घेतले नाही.
‘एबीसी न्यूज’च्या ‘धिस वीक’ या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले की, माझ्या मते, जे देश अजूनही रशियासोबत करार किंवा व्यवहार करत आहेत. त्या देशांवर शुल्क लावण्याची कल्पना योग्यच आहे.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तियानजिनमधील छायाचित्रांकडे पाहून निर्बंध लावण्याची योजना अंगलट आली, असे तुम्हाला वाटते का?, असा सवाल झेलेन्स्की यांना विचारण्यात आला असता त्यांनी हे मत व्यक्त केले.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील शुल्क दुप्पट करत ५० टक्क्यांपर्यंत नेले असून, भारताने रशियन कच्चे तेल खरेदी केल्यामुळे अतिरिक्त २५ टक्के शुल्क लादण्यात आले आहे. भारताने अमेरिकेच्या या कारवाईला “अन्यायकारक, अव्यवहार्य आणि अनुचित” म्हटले आहे.
झेलेन्स्की यांनी ३० ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींना फोन केला होता. हा कॉल मोदी-पुतिन यांच्या तियानजिन येथे होणाऱ्या ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एससीओ) शिखर परिषदेतील भेटीच्या दोन दिवस आधी करण्यात आला होता. यावेळी झेलेन्स्की यांनी रशियाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले आणि युद्धाचा शेवट तत्काळ युद्धविरामाने व्हायला हवा, असे नमूद केले.
युक्रेन संघर्षात शांतता प्रयत्नांना भारताचा पाठिंबा
भारताने स्पष्ट केले की, मोदींनी युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी भारताची "दृढ आणि सातत्यपूर्ण भूमिका" पुन्हा अधोरेखित केली आणि शक्य तितक्या लवकर शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शविला.
‘हे रक्तरंजित पैसे’ - ट्रम्प सल्लागाराचा आगाऊपणा सुरूच
भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. हा प्रकार म्हणजे ‘रक्तरंजित पैसे’ (ब्लड मनी) असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी केला आहे. ते म्हणाले की, युक्रेन युद्धापूर्वी भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी केले नव्हते. हे रक्तरंजित पैसे आहेत आणि लोक मरत आहेत. गेल्या आठवड्यात नवारो म्हणाले की, भारताच्या सर्वाधिक शुल्कांमुळे अमेरिकेतील नोकऱ्या जात आहेत. भारत फक्त नफा मिळवण्यासाठी रशियन तेल खरेदी करतो. यातून मिळणारे उत्पन्न रशियाच्या युद्ध यंत्रणेला पुरवले जाते. युक्रेनियन/रशियन लोक मरतात. अमेरिकन करदात्यांचे पैसे अधिक खर्च होतात. भारत सत्य सहन करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीचे समर्थन करताना भारत कायम सांगत आला आहे की त्याची ऊर्जा खरेदी ही राष्ट्रीय हितसंबंध व बाजारातील परिस्थितीवर आधारित आहे.