

वॉशिंग्टन : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि भारतीय वंशाचे नागरिक जोहरान ममदानी यांनी मोठा विजय मिळवला. ते न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि सर्वात तरुण महापौर ठरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांना उघड विरोध केला होता. मात्र, तरीही ममदानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्या आणि टीकेला न जुमानता निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी अपक्ष उमेदवार आणि माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो त्याचबरोबर रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लिवा यांचे वर्चस्व मोडीत काढत विजय मिळवला. जोहरान ममदानी यांना ९,४८,२०२ मते (५०.६ टक्के) मिळाली. अपक्ष उमेदवार अँड्र्यू कुओमो यांना ७,७६,५४७ (४१.३ टक्के) आणि कर्टिस स्लिवा यांना १,३७,०३० इतकी मते मिळाली.
या विजयानंतर ममदानी म्हणाले की, “हा विजय केवळ त्यांचा नसून नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वासाचा आणि एकतेचा विजय आहे. ज्या शहरात डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म झाला, तेच शहर आता देशाला दाखवेल की, ट्रम्प यांना कसे पराभूत केले जाते. राजकीय काळोख पसरला असताना याक्षणी न्यूयॉर्कमध्ये मात्र एक नवी पहाट झाली आहे.”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून उघड विरोध केला होता. २९ सप्टेंबर रोजी त्यांनी न्यूयॉर्कच्या मतदारांना उद्देशून सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ममदानी जर निवडून आले तर न्यूयॉर्क शहराचा निधी अडवू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. जोहरान ममदानी हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांच्या विजयाने ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. ममदानी ३४ वर्षांचे असून त्यांचा जन्म युगांडाच्या कंपालामध्ये झाला आहे. ममदानी यांचे वडील महमूद हे भारतात जन्मले असून युगांडाचे नागरिक आहेत. त्यांची आई मीरा नायर ही भारतातील प्रसिद्ध चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शक आहे. सात वर्षांचे असताना जोहरान आपल्या पालकांसह न्यूयॉर्कला स्थलांतरित झाले. २०१८ मध्ये त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले आणि त्यांनी रामा दुवाजीशी लग्न केले.
सिनसिनाटीच्या महापौरपदी आफ्ताब पुरेवाल
भारतीय वंशाच्या आफ्ताब पुरेवाल यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचे सावत्र भाऊ कोरी बोवमन यांचा पराभव करून दुसऱ्यांदा सिनसिनाटी शहराच्या महापौरपदी विराजमान होण्याचा मान पटकावला आहे. ४३ वर्षीय पुरेवाल हे २०२१मध्ये ६६ टक्के मते मिळवत महापौरपदी निवडून आले होते. पुरेवाल यांचे वडील हे पंजाबी असून त्यांची तिबेटियन आई लहानपणी चीनच्या छावणीतून पळून गेली होती.
व्हर्जिनियाच्या गर्व्हनरपदी गझाला हाश्मी
व्हर्जिनिया राज्याच्या लेफ्टनंट गर्व्हनरपदी जन्माने भारतीय असलेल्या अमेरिकन राजकीय नेत्या गझाला हाश्मी या निवडून आल्या आहेत. व्हर्जिनिया राज्याच्या प्रमुख पदावर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम आहेत. हाश्मी यांना ५४.२ टक्के मते पडली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन नेते जॉन रिड यांना ४९ टक्के मते मिळाली.