
चैत्र नवरात्री आजपासून (रविवार दि.३०) सुरू होत आहे. शारदीय नवरात्रीप्रमाणेच या नऊ दिवसातही देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या नऊ रुपांना अनुसरून ९ भाग्यशाली रंगाचे कपडे परिधान केल्याने भाग्य उजळून आई भगवतीचा आशीर्वाद मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. चला जाणून घेऊया पहिल्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंतचे ९ रंग कोणते?
पहिला दिवस
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी भगवतीच्या शैलपुत्री रुपाची पूजा केली जाते. शैलपूत्री अर्थात हिमालयाची कन्या पार्वती. या दिवशी नारंगी रंग घालणं भाग्यशाली आहे, असे मानले जाते. हा रंग मांगल्य आणि सकारात्मक उर्जेचा प्रतिक मानला जातो. त्यामुळे या दिवशी नारंगी रंग परिधान केल्याने आयुष्यात सकारात्मकता वाढते.
दुसरा दिवस
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या दिशवी पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. पांढरे शुभ्र वस्त्र हा शांती आणि ब्रह्मचर्याचे प्रतिनिधीत्व करतो. तसेच हा रंग चंद्राशी जोडला गेला आहे. त्याचा मनाशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे या दिवशी पांढरा रंग घातल्याने मनाला शांती प्राप्त होते.
तिसरा दिवस
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. देवी चंद्रघंटा हे शक्ती आणि साहसाचे प्रतिक आहे. लाल रंग हा शक्तिचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे देवी चंद्रघंटाची पूजा करताना लाल रंगाचे कपडे घातले जातात. यामुळे शक्तिचा संचार होतो.
चवथा दिवस
नवरात्रीच्या चवथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा बांधली जाते. या दिवशी बुद्धी आणि ज्ञानाला महत्त्व दिले जाते. देवी कुष्मांडाच्या पूजेच्या वेळी किंवा या दिवशी रॉयल ब्लू (निळा) रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. यामुळे आपल्याला वैचारिक दृष्टीकोन प्राप्त होतो.
पाचवा दिवस
नवरात्रीचा पाचवा दिवस हा स्कंदमातेच्या पूजेचा दिवस असतो. स्कंदमातेची पूजा सूख-शांती-समृद्धीसाठी केली जाते. त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालण्याला महत्त्व आहे.
सहावा दिवस
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. देवी कात्यायनीच्या पूजेत हिरव्या रंगाला महत्त्व आहे. हिरवा रंग हा निसर्गाशी जवळीक साधणारा आहे. तसेच हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतिक मानला जातो. त्यामुळे या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घालण्याला महत्त्व आहे.
सातवा दिवस
नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. देवी कालरात्रीचे रूप हे उग्र आहे. हे रुप दुष्ट शक्तींचा नाश करते. त्यामुळे या दिवशी राखाडी रंगाचे कपडे घालावे.
आठवा दिवस
नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा प्रेम, समृद्धी, सुखशांती प्राप्त करण्यासाठी केली जाते. त्यामुळे यादिवशी जांभळा रंग घालणे शुभ मानले जाते. यामुळे प्रगती होते.
नववा दिवस
नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धदात्रीची पूजा केली जाते. हा नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. यादिवशी रामनवमी देखील आहे. या दिवशी आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रार्थना केली जाते. त्यामुळे देवी सिद्धदात्रीची पूजा मोरपंखी रंगाचे कपडे घालून केली जाते. मोरपंखी रंग मनाला शांती, आनंद प्रदान करतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)