
कितीही महाग, चांगल्या प्रतिची टूथपेस्ट वापरली तरी अनेकांना दातांच्या समस्या जाणवतात. दंतरोगाच्या समस्यांवर आधुनिक काळात अनेक उपचार आहेत. मात्र, हे उपचार महाग असतात. तसेच दंतरोगांवरील उपचारांवर आरोग्य विमा देखील मिळत नाही. परिणामी हा खर्च आपल्याला स्वतःच्याच खिशातून करावा लागतो. सातत्याने काही ना काही खात राहणे, प्रमाणापेक्षा जास्त जंक फूड खाणे यामुळे दातांच्या समस्या निर्माण होतात. त्यानंतर नीट काळजी न घेतल्याने दंतरोग होतात. मात्र, आपण आपल्या जीवनशैलीत छोटा बदल करून दातांच्या समस्यांना वेळीच रोखू शकतो.
सामान्यपणे दिवसातून दोन वेळा टूथब्रशने ब्रश करण्याची अनेकांना सवय असते. सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करण्याची सवय असते. दोन वेळा दात स्वच्छ करमे ही चांगली सवय असते. मात्र, दात स्वच्छ करताना योग्य ती काळजी घेतली जात नाही. दात घासताना अनेक वेळा लवकर आटोपण्यासाठी खूप जोर देऊन ब्रश फिरवतात. मात्र, ही सवय योग्य नाही. दात घासताना ब्रशवर खूप जोर देऊन दात स्वच्छ केल्याने मसुड्यांची झीज होते. परिणामी नंतरच्या काळात दातांचे आजार उद्भवू शकतात.
दोन वेळा दात स्वच्छ करूनही दात किडतात?
जे लोक दोन वेळा योग्य पद्धतीने दात स्वच्छ करतात दातांची काळजी घेतात त्यांचेही दात किडल्याचे आढळून आले आहे. यामागील कारणांचा बारकाईने जेव्हा विचार करतो तेव्हा आजच्या जीवनशैलीत मागे पडत चाललेली एक महत्त्वपूर्ण सवय कारणीभूत असू शकते. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी आपण दात घासतो. मात्र मधल्या १२ ते १३ तासात आपण अनेक वेळा काही ना काही खात असतो. याचे काही बारीक कण दातात अडकत असतात. मात्र, प्रत्येक वेळी खाल्ल्यानंतर ब्रश करणे शक्य नसते. मात्र, काहीही खाल्ल्यानंतर लगेच ब्रश करणे अपेक्षितही नसते. तर आपल्या संस्कृतीत जेवणानंतर चूळ भरण्याला महत्त्व दिले आहे. ज्यामुळे दाताचे आरोग्य चांगले राहते.
जेवणानंतर चूळ भरणे का आहे महत्त्वाचे?
आपल्या पूर्वजांनी जेवणानंतर चूळ भरण्याची सवय लावली आहे. मात्र, आजकालच्या जीवनशैलीत आपण जेवणानंतर चूळ भरणे विसरत चाललो आहोत. तसेच तर दिवसभर आपण थोड्याथोड्या वेळाने काही ना काही खात असतो. प्रत्येक वेळी चूळ भरणे शक्य नसते. मात्र, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण दिवसभरात किमान चार वेळा जेवणानंतर चूळ भरायला हवी. यामुळे दातात अडकलेले अन्नाचे कण निघून जातात. याशिवाय जंक फूडमुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात. तसेच ज्या ठिकाणी टूथ ब्रश पोहोचत नाही त्या ठिकाणचे अन्नाचे कण देखील चूळ भरल्यामुळे निघून जाते.
कशी भरतात चूळ?
चूळ भरण्याची एक पद्धत आहे. नुसतेच तोंडात पाणी घेऊन गुळणा करणे म्हणजे चूळ भरणे नव्हे. चूळ भरण्यासाठी पहिले पाणी तोंडात घेऊन ते तोंडात चहूबाजूंनी फिरवायला हवे. त्यानंतर गुळणा करून ते सिंकमध्ये थुंकावे. त्यानंतर पुन्हा नवीन पाणी घेऊन पुन्हा एकदा हीच प्रक्रिया करावी. त्यानंतर दातांवर चहूबाजूने बोटांद्वारे हलकी मालिश करून पुन्हा तोंडात पाणी घ्यावे, गुळणा करावा. किमान दोन वेळा ही प्रक्रिया करावी. जेवणानंतर दररोज नियमितपणे चूळ भरल्याने दाताचे आरोग्य निरोगी राहते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)