
- लोकवाङ्मयातली खाद्यसंस्कृती
- डॉ. मुकुंद कुळे
अक्षय्य तृतीया म्हणजे खानदेशातला आखाजीचा उत्सव. सासुरवाशिणींसाठी हक्काने माहेरी येण्याचा सण. माहेरी येणाऱ्या लेकीसाठी आणि गौरीसाठी आमरस आणि मांड्यांचा खास स्वैपाक केला जातो. माहेरी न्यायला येणाऱ्या भावासाठी बहीणही आमरस-तुपाची वाटी तयार ठेवते. भाऊही लाडाच्या बहिणीसाठी अख्खी आमराई देऊ करतो. एकूण आखाजी आणि आंबा यांचा गोडवा अतूट आहे.
‘‘आखजीचा आखजीचा,
मोलाचा सन देखा जी
निंबावरी निंबावरी,
बांधला छान झोका जी
झाला सुरू झाला सुरू,
पहिला माझा पिंगा जी
फुगड्यांचा फुगड्यांचा,
चालला धांगडधिंगा जी”
बहिणाबाई चौधरींनी वर्णन केल्याप्रमाणे एव्हाना खानदेशातल्या लेकीबाळींना माहेरची स्वप्नं पडायलाही लागली असतील. नुकतंच लग्न झालेली सासुरवाशीण असो नाहीतर संसारात रमून आता जुनी झालेली सासुरवाशीण असो... आखाजीचा सण जवळ आला की खानदेशातल्या मायमालनींना माहेराची ओढ लागते. माहेरगावाहून येणाऱ्या मुराळ्यांची त्या वाट पाहू लागतात... कारण आखाजीच्या सणाला कधी एकदा माहेरी जाते नि सयांना बोलावून आंब्या-लिंब्याच्या झाडाला झोका बांधते, असं त्यांना झालेलं असतं.
अक्षय्य तृतीया म्हणजेच आखाजीचा हा सण उर्वरित महाराष्ट्रात फारसा साजरा केला जात नाही, परंतु खानदेशात मात्र आखाजी म्हणजे दुसरी दिवाळीच. दिवाळीसारखाच खाद्यपदार्थांचा तामझाम आखाजीला केला जातो. कारण या सणाला त्यांची गौरबाय घरी येणार असते. ही गौरबाय म्हणजे सासरी गेलेली लेक तर असतेच, परंतु त्याशिवाय आखाजीला खानदेशात गौरीची प्रतिष्ठापना करून तिची पूजाही करतात. मग तिच्या नैवेद्यासाठी करायच्या खाद्यपदार्थांचीच तयारी कितीतरी दिवस आधी सुरू असते. मात्र नैवेद्याच्या या ताटात इतर कितीही पदार्थ असू देत, त्यात आंब्याचा रस आणि मांडा नसेल तर सारंच व्यर्थ. कारण देवाला दाखवायचा नैवेद्य असेल किंवा वैशाख शुद्ध तृतीयेला खास पितरांना दाखवायचं ताट असेल, खानदेशात देव आणि पितरांना आमरस-मांडा खाऊ घातल्याशिवाय आंबा किंवा आंब्याचे पदार्थ खायला सुरुवात करत नाहीत.
आता डिसेंबर-जानेवारी महिन्यातच आंब्याची पहिली पेटी बाजारात येते. पण गावाकडे मात्र, अक्षय्य तृतीयेशिवाय आंबा खायला सुरुवात करीत नाहीत. पूर्वी आंबा नैसर्गिकरीत्या झाडावरच पिकेपर्यंत अक्षय्य तृतीया जवळ आलेली असायची. साहजिकच मग तिचाच मुहूर्त साधून त्यादिवशी घरच्या-गावच्या देवाला आंबा दाखवून तो खायला घरोघरी सुरुवात व्हायची. अर्थात खानदेशात आखाजीच्या सणाला मोठा मान असल्यामुळे तिथे रस-मांड्याला जी प्रतिष्ठा आहे ती इतरत्र नाही.
पुरण भरून केलेल्या पोळीला महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी ‘पुरणपोळी’ असंच म्हटलं जातं. खानदेशात मात्र तिला ‘मांडा’ म्हणतात. हा मांडा करण्याची पद्धतही पुरणपोळीपेक्षा एकदम भन्नाट आहे. पुरणपोळी पोळपाटावर लाटून तव्यावर शेकवली जाते. पण मांडा मात्र रुमाली रोटीसारखा दोन हातांचे पंजे आणि हाताचा कोपरांपर्यंतचा भाग वापरून केला जातो. दोन हातांचा सुरेख ताल नि तोल सांभाळत केलेला हा भलामोठा मांडा शेकवण्यासाठी खास मातीच्या मोठ्या अर्धगोलाकार खापराचा वापर केला जातो. मोठ्या आकाराच्या पसरट खापराच्या खाली जाळ केला जातो आणि त्याच्यावर पातळ मांडा खरपूस शेकवला जातो. आतमध्ये पुरण भरलेला हा मांडा न फुटता एवढा मोठा कसा केला जातो, याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. पण त्याचं गुपित गव्हाच्या पिठात असतं. एरवी पुरणपोळीसाठी गव्हाचं नेहमीचंच पीठ वापरलं जातं. मात्र, मांड्यासाठी पीठ दळताना आधी गहू रात्रभर भिजवून मग सुकवून दळले जातात. गहू भिजवलेले असल्यामुळे त्यातला चिवटपणा वाढतो आणि म्हणूनच मांडा कितीही मोठा केला, तरी तो फाटत नाही.
मोठी कसरत करून केलेल्या या मांड्याला खानदेशच्या खाद्यसंस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुणाचाही पाहुणचार करायचा असो, जावयाला बोलवायचं असो किंवा आखाजीचा कुलधर्म-कुळाचार असो, त्या दिवशी मांडा केला जातोच. हा मांडा दूध किंवा कटाच्या आमटीबरोबरही खाल्ला जातो. मात्र आंब्याच्या दिवसांत तो खास आमरसाबरोबरच खाल्ला जातो. अर्थात मांडा आंब्याच्या रसाबरोबर वाटेल तेव्हा खाता येत नाही. अक्षय्य तृतीयेला आधी देवाला-पितरांना मांडा नि आमरसाचा नैवेद्य दाखवला जातो आणि मगच रसाबरोबर मांडा खायला घरोघर सुरुवात होते.
मांड्याचा उल्लेख निघाला की खापर मिळालं नाही म्हणून लहानग्या मुक्ताईने ज्ञानदेवांच्या पाठीवर थापलेल्या आणि शेकवलेल्या मांड्यांची आठवण होते. खरं तर खानदेशात केला जाणारा मांडा हा पुरणाचा असतो, मात्र मराठवाडा-विदर्भात काही ठिकाणी हातावरच वाढवत नेलेल्या पातळ लांब चपातीला किंवा भाकरीलाही मांडा म्हणतात. कारण तोही मातीच्या खापरावरच भाजला जातो. आता मुक्ताईने केलेला मांडा पुरणाचा होता की साधा माहीत नाही. परंतु मुक्ताईची मांड्याची कथा सर्वज्ञात असल्यामुळे मांडा हा पदार्थ थेट तेराव्या शतकाइतका जुना असल्याची मात्र खात्री पटते. खरं तर मांडा त्यापेक्षाही जुनाच असेल कदाचित. अर्थात मुक्ताईचा मांडा कसाही असो, आमच्या गावोगावच्या मायबाईंना त्याचं किती कवतिक, म्हणून तर त्या मायेनं म्हणतात-
“माझी ग मुक्ताई कशी फिरे दारोदार
कुणीबी देईना तिला मातीचं खापार
ज्ञानोबा म्हणतो नको रडू धाईधाई
माझ्या पाठीवर कर मांडे मायबाई..”
खानदेशात आखाजीला आमरस-मांड्याला असलेला मान उर्वरित महाराष्ट्रात नाही, तरीही अक्षय्य तृतीया आणि आंब्याचं खास नातं आहे एवढं नक्की... म्हणून तर लोकवाङ्मयात अक्षय्य तृतीया आणि आंबा-आमरसाचे अनेक उल्लेख आढळतात -
“बंधुजी पावईना आला,
आख तिजंच्या दिसांत
माझ्या हवशाला वाढते तूप
आंब्याच्या रसात..”
...आणि मग एकदा का अक्षय्य तृतीया होऊन गेली आणि आंबे खाण्याचे दिवस सुरू झाले की गावोगावच्या मायबहिणींच्या रसवंतीला नुसता बहर येतो. त्यामुळेच तर आंबा, आमरस, आमराई असे उल्लेख असलेल्या अनेक ओव्या नि लोकगीतं सापडतात-आंब्याचा आमरस केळ्याचं शिकरण
बंधूला किती सांगू तुझ्याविना सख्खं कोण..
अर्थात कधी कधी काही लोकगीतांतून लग्न होऊन सासरी गेलेली सासुरवाशीण आपला माहेरच्या इस्टेटीतला हक्कही सांगते. पूर्वी कायदा नसला तरी एखादा माय-बाप स्वतःहून आपल्या लेकीला जमिनीचा, झाडामाडाचा तुकडा द्यायचा. म्हणून तर एखादी मायबाई हक्काने म्हणते -
आंब्याची आमराई केळीचा बाग मोठा
सांगते भाऊराया, त्यात चवथा माझा वाटा..
असं असलं तरी घरोघरच्या बहिणाबाईंचा तो अनेकदा केवळ प्रेमाचा हक्क असायचा आणि त्या तो गमतीगमतीनेच सांगायच्या. त्यांना काही माहेरच्या संपत्तीत खरोखरचा हिस्सा नको असायचा. आईबापाच्या पाठी भाऊ-भावजयीने आपलं सुखाचं हक्काचं माहेर सुरू ठेवावं एवढीच त्यांची इच्छा असायची. म्हणूनच मग कधी एखादा भाऊ घरी येऊन नीट जेवला नाही की त्यांच्या जीवाची नुसती उलघाल व्हायची.
आंब्याचा आमरस ताटी तसाच राहिला
सयानू काय सांगू बंधू नाही ग जेवला..
इस्टेट-संपत्ती म्हटली की मात्या-पित्याच्या पाठी भावंडांची एकमेकांच्या विरोधातली गाऱ्हाणी ठरलेलीच. काळ आताचा असो वा पूर्वीचा, त्यात काही फरक नव्हता आणि नाही. तरीही एखादा भाऊ आपल्या बहिणीसाठी केवळ माहेरची वाटच मोकळी ठेवायचा असं नाही, तर माहेरच्या संपत्तीतला तिचा वाटाही तिला हक्काने द्यायचा. म्हणून तर एखादी बहिणाबाई आपल्या सयांना आपल्या भावाचं कौतुक सांगायची -
बहीण-भावाचा, कसा विचार चांगला
भाऊ पुसे बहिणीला, माडी बांधू का बंगला
काय सांगू सयांनो, माझ्या बंधूची उतराई
माझ्या ग नावानं केली सारी आमराई...
अक्षय्य तृतीयेपासून जेवणात सुरू झालेला आम्रमहोत्सव लोकवाङ्मयात ठायीठायी सापडतो. अर्थात खानदेशात आखाजीच्या सणाला असलेली रस-मांड्याची नि मायबाईच्या उत्सवाची झळाळी इतरत्र नाही. अक्षय्य तृतीयेला नव्या सासुरवाशिणींनी माहेरी यायची परंपरा अगदी पूर्वापार आहे. पूर्वी माहेरी जाण्यासाठी सणावाराचीच वाट पाह्यली जायची. त्यामुळेच सणाला माहेरी आल्यावर ते दिवस पटकन भुर्रर्र उडून जायचे नि मग आमच्या बहिणाबाई चौधरी म्हणतात, तशा या नव्या सासुरवाशिणींना आता परत आखाजी कधी, असा प्रश्न पडायचा -
माझा झोका माझा झोका,
खेयतो वाऱ्यावरी जी
गेला झोका गेला झोका,
चालला माहेराले जी
आला झोका आला झोका,
पलट सासराले जी
सन सरे आस उरे, आखजी गेली व्हय जी
सांग सई सांग सई,
आखजी आतां कही जी?..”
तर असा हा आखाजी..ओव्या ओव्यांमध्ये बांधलेला, मनामनात रुतलेला..
लोकवाङ्यमयाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार.