Alvida Jummah 2025: रमजान महिन्यात 'अलविदा जुम्मा'चे काय आहे महत्त्व; जाणून घ्या Zuhr नमाजची वेळ

रमजान महिन्यात 'अलविदा जुम्मा' हा विशेष दिवस असतो. या दिवसाचे इस्लामिक मान्यतेनुसार खोल आध्यात्मिक महत्त्व आहे. जाणून घेऊया काय आहे 'अलविदा जुम्मा' आणि Zuhr (झुहर) नमाजाची वेळ तसेच महत्त्व...
Alvida Jummah 2025: रमजान महिन्यात 'अलविदा जुम्मा'चे काय आहे महत्त्व; जाणून घ्या Zuhr नमाजची वेळ
FPJ
Published on

इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान (Ramzan) महिना आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. या काळात मुस्लिम बांधव रोजा अर्थात उपवास करतात. सोबतच अल्लाहची भक्ती आणि चिंतनात हा संपूर्ण महिना घालवतात. रमजान महिन्यात 'अलविदा जुम्मा' हा विशेष दिवस असतो. या दिवसाचे इस्लामिक मान्यतेनुसार खोल आध्यात्मिक महत्त्व आहे. जाणून घेऊया काय आहे 'अलविदा जुम्मा' आणि Zuhr (झुहर) नमाजाची वेळ तसेच महत्त्व...

अलविदा जुम्मा किंवा जमात-उल-विदा

ईद-उल-फितरच्या अर्थात रमजान ईदच्या आनंदी उत्सवापूर्वीचा शेवटचा शुक्रवार असतो त्याला अलविदा जुम्मा किंवा जमात-उल-विदा असेही म्हणतात. "जुम्मा-उल-विदा(Jumat-ul-Wida)" हा शब्द दोन अरबी शब्दांपासून आला आहे. जुम्मा याचा अर्थ एकत्र येणे असा आहे. तर विदा याचा अर्थ निरोप देणे, असा होतो. अर्थात या एकत्रित येणे हे या दिवसाचे विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे.

अलविदा जुम्मा २०२५ कधी आहे?

या वर्षी, अलविदा जुम्मा शुक्रवारी २८ मार्च २०२५ रोजी साजरा केला जाईल. अलविदा जुम्मा हा यावेळी रमजानच्या समाप्तीच्या अगदी आधी येत असल्याने, मुस्लिम कॅलेंडरमध्ये या दिवसाचे खूप महत्त्व आहे. या दिवशी रमजानच्या पवित्र महिन्याला मनापासून निरोप दिला जातो. आणि रमजान महिन्यात शिकलेल्या संयम, दयाळूपणा आणि भक्तीचे धडे पुढे नेण्याची आठवण करून देतो.

झुहरची (Zuhr) नमाज

इस्लाममध्ये प्रार्थनेला खूप महत्त्व आहे आणि रमजानमध्ये, शुक्रवारची नमाज किंवा जुम्मा नमाज विशेष अर्थपूर्ण बनते. मुस्लिम बांधव पाच वेळा नमाज अदा करतात आणि दुपारची नमाज, ज्याला 'झुहर' म्हणून ओळखले जाते. शुक्रवारी ही नमाज सामूहिक जुम्मा नमाजमध्ये रूपांतरित होते.

झुहरची (Zuhr) नमाजची वेळ

भारतात, अलविदा जुम्मा नमाजची वेळ स्थानानुसार बदलू शकते. उदाहरणार्थ, दिल्लीत, २८ मार्च रोजी दुपारी १२:३३ वाजता झुहरची नमाज सुरू होण्याची अपेक्षा आहे. ऐतिहासिक जामा मशिदीत, प्रवचन सामान्यतः दुपारी १ वाजता सुरू होते. त्यानंतर दुपारी १:३० ते २ दरम्यान मुख्य नमाज पढली जाते.

अलविदा जुम्मा महत्त्व

मुस्लिमांसाठी अलविदा जुम्मा खूप महत्त्वाचा आहे कारण या दिवशी मशिदींमध्ये एकत्र येऊन विशेष नमाज अदा करतात, कृतज्ञता व्यक्त करतात आणि कोणत्याही चुकांसाठी क्षमा मागतात. मुस्लिम बांधव रमजानमध्ये त्यांच्या आध्यात्मिक प्रवासावर चिंतन करतात, पवित्र कुराणातील आयतींचे पठण करतात. याशिवाय रमजानमध्ये दानधर्म करण्यावर विशेष भर देतात. गरजूंना मदत करून, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. आपल्या चुकांसाठी क्षमा मागून, मुस्लिम त्यांचा विश्वास मजबूत करण्याचा आणि महिना संपल्यानंतरही रमजानची मूल्ये चालू ठेवण्याचा प्रयत्न करतात.

logo
marathi.freepressjournal.in