कोणत्याही कलेत परीपुर्ण व्हायचं असेल तर आधी त्या कलेचं बेसिक ज्ञान आपल्याला असायला हवं. स्वयंपाक करणं ही पण एक कला आहे. स्वयंपाक करणं ही फक्त महिलांची जबाबदारी नसल्याने बऱ्याच पुरूषांना ही स्वयंपाकाची आवड निर्माण होत आहे. पण स्वयंपाकाच बेसिक ज्ञान, किचन मॅनेजमेंट प्रत्येकाला यायलाच हवं. नोकरी, शिक्षणासाठी बाहेर राहणाऱ्या मुलांना- मुलींना दररोजचं मेस अथवा हॉटेलमधील जेवण आवडत नाही. शिवाय घरात स्वयंपाकासाठी कूक असेल तरी कधी ना कधी तरी त्याला सुट्टी द्यावीच लागते. त्यामुळे कधी ना कधी स्वयंपाक करण्याची वेळ तर येतेच. अश्या वेळी स्वयंपाक करताना माहीती असाव्यात अश्या काही बेसिक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.
किचन टिप्स
एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा. त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा. योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या.
स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी आधीच तयार करून ठेवा.
भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा.
कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला.
डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा.
स्वयंपाक करायला सुरूवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो.
भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा दोन तीन दिवसांसाठी तयार करून ठेवा. यासोबतच पौष्टीक आणि चविष्ट पालक भाजी करण्यासाठी फॉलो करा या रेसिपीज
लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो.
शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते.
खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपू्र्ण खोवून फ्रिजमध्ये ठेवा. ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल.
पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुशखुशीत होतात. पराठा, शंकरपाळी, कचोरीसाठी या टिप्सचा वापर करा.
गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा ज्यामुळे ते करपणार नाहीत.
गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दुध वापरा ज्यामुळे त्यांचा टेक्स्चर छान येईल.
दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या.
फ्रिजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा. ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं सोपं जाईल.
एखाद्या पदार्थांसाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनीटे पाण्यात भिजत ठेवा.
भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका.
न्यूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा.
रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात एक तास भिजत ठेवा.
थंडीच्या दिवसांमध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅसजवळ ठेवा.
बटाटे लवकर उकडण्यासाठी वीस मिनीटे पाण्यात भिजत ठेवा.
लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनीटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा.
मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा.
भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही.
कणिक मळताना चिमुटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत.
शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा.
वांग, दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे.
दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दुध फाटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे.