भलतेसलते ‘ॲप इन्स्टॉल’ कराल तर गोत्यात याल; अनाहुत कॉलना प्रतिसाद देताना विचार करा

‘रिमोट अ‍ॅक्सेस ॲप’ फसवणूक हा एक असा घोटाळा आहे, ज्यात सायबर गुन्हेगार तांत्रिक सहाय्यक कर्मचारी असल्याचे भासवून अथवा परतावा देण्याची प्रक्रिया करत असल्याचे भासवून लोकांना फसवे ‘ॲप इन्स्टॉल’ करण्यास भाग पाडतात, जे त्यांना पीडिताच्या ‘डिव्हाईस’वर नियंत्रण मिळवण्यास मदत करतात.
भलतेसलते ‘ॲप इन्स्टॉल’ कराल तर गोत्यात याल; अनाहुत कॉलना प्रतिसाद देताना विचार करा
Published on

मुंबई : ‘रिमोट अ‍ॅक्सेस ॲप’ फसवणूक हा एक असा घोटाळा आहे, ज्यात सायबर गुन्हेगार तांत्रिक सहाय्यक कर्मचारी असल्याचे भासवून अथवा परतावा देण्याची प्रक्रिया करत असल्याचे भासवून लोकांना फसवे ‘ॲप इन्स्टॉल’ करण्यास भाग पाडतात, जे त्यांना पीडिताच्या ‘डिव्हाईस’वर नियंत्रण मिळवण्यास मदत करतात.

ठाणे येथील वृद्धाने एका अज्ञात कॉलरने केलेल्या विनंतीवरून 'एनीडेस्क' इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्या दोन क्रेडिट कार्डमधून साडेतीन लाख रुपये गमावले. दुसऱ्या घटनेत, कन्नूर येथील एका रहिवाशाला बँकेचा कार्यकारी अधिकारी अशी ओळख देणाऱ्या व्यक्तीने त्याच्या मोबाईल फोनवर ‘लिंक’ पाठवून ॲप अपडेट करण्यास सांगितले. त्यानंतर बँक खात्यातून ९.२४ लाख रुपये काढून घेतले.

सायबर गुन्हेगार शक्यतो बँकांसारख्या विश्वासार्ह अर्थसंस्थांची तोतयागिरी करतात. ‘स्क्रीन-शेअरिंग ॲप्स’द्वारे त्यांनी डिव्हाइसेसमध्ये एकदा प्रवेश मिळवला की ते वैयक्तिक माहितीसारखा संवेदनशील डेटा चोरू शकतात, खात्यांवर नियंत्रण ठेवू शकतात आणि फसवे व्यवहारही करू शकतात.

फोनवरून अज्ञात लोकांशी झालेल्या संभाषणानंतर ‘एनीडेस्क’सारखे ‘रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप्लिकेशन’ डाऊनलोड करताना अथवा बँकिंग अ‍ॅप्स अपडेट करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

कोणी संगणक प्रणालीच्या रिमोट ॲक्सेससाठी 'एनीडेस्क' ॲप वापरत असेल तर ते टाळा. या ॲपबद्दल बरीच प्रकरणे नोंदवली जात आहेत. प्रत्येक सत्रासाठी नवीन ‘यूजर आयडी’ आणि ‘पीडब्ल्यूडी’ जनरेट करणारे कोणतेही ॲप वापरा. रिझर्व्ह बँकेने हे ॲप वापरू नये, अशी विनंती करणारे परिपत्रकही जारी केले आहे.

सायबर गुन्हेगार लोकांच्या बँक खात्यांमधून पैसे चोरण्यासाठी दररोज असे नवनवीन मार्ग शोधत आहेत. बँकिंगशी संबंधित सर्व एसएमएस आणि फोन कॉल्सपासून दूर राहणे हाच एकमेव पर्याय आहे. ‘रिमोट ॲक्सेस’ ॲप इन्स्टॉल केल्याने मोबाइल फोन आणि संगणक डिव्हाइस पूर्णपणे असुरक्षित बनतात. जागरूकतेचा अभाव हा लोक अशा सापळ्यात अडकण्याचे मुख्य कारण आहे.

काय कराल?

-विचार करून विश्वास ठेवा : तुम्हाला माहीत नसलेल्या आणि विश्वास नसलेल्या कोणालाही कधीही ‘रिमोट अ‍ॅक्सेस’ देऊ नका.

-ओळख पडताळणी करा : कॉलरची ओळख थेट स्वतःहून निश्चित करा (त्यांनी दिलेल्या नंबरद्वारे नाही).

-अज्ञात सॉफ्टवेअर टाळा : तुम्हाला खात्री नसल्यास एखाद्याच्या विनंतीवरून सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नका.

-सावधगिरी बाळगा : अनपेक्षित कॉल, संदेश, ईमेलपासून सावध रहा.

-सुरक्षा वाढवा : मजबूत पासवर्ड वापरा आणि ‘मल्टी-फॅक्टर ऑथेंटिफिकेशन’ सक्षम करा.

काय टाळाल?

-सुरक्षितपणे डाऊनलोड करा : फक्त अधिकृत स्त्रोतांकडून व जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच ‘स्क्रीन-शेअरिंग ॲप’ डाऊनलोड करा.

-सुरक्षित पेमेंट ॲप : कोणतेही ‘स्क्रीन-शेअरिंग सॉफ्टवेअर’ डाउनलोड करण्यापूर्वी सर्व पेमेंटसंबंधित ॲप्समधून लॉग आऊट करा.

-वापरानंतर ॲप काढून टाका : काम पूर्ण झाल्यावर ‘स्क्रीन-शेअरिंग ॲप’ अनइन्स्टॉल करा.

-तुमचा डेटा सुरक्षित करा : कधीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करू नका.

logo
marathi.freepressjournal.in