
उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हापासून बचावासाठी अनेक जण सनस्क्रीन वापरतात आणि मग उन्हात बाहेर पडतात. उन्हाच्या तीव्र तडाख्यापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी हे उपयुक्त जरी वाटत असले तरी अलीकडील काही अभ्यासांमध्ये सनस्क्रीनच्या वापरामुळे वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात, असे दिसून आले आहे. विशेष करून जीवनसत्व 'ड' वर याचा मोठा परिणाम होतो. त्वचेच्या काळजीसाठी हल्ली आपण पूर्णपणे उन्हात जाणेच नाकारतो. मात्र, तुम्ही हे विसरता शरीराला ऊन मिळणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.
'ड' जीवनसत्वाचे महत्व
शरीरासाठी 'ड' जीवनसत्व अतिशय आवश्यक असते. जीवनसत्व 'ड'च्या कमतरतेमुळे सरळ तुमच्या स्नायुंच्या बळकटींवर परिणाम होतो. तुमची हाडे 'ड' जीवनसत्वाच्या अभावामुळे कमकुवत होतात. परिणामी गुडघेदुखी, सांधेदुखी अशा आजारांना सामोरे जावे लागते. याशिवाय 'ड' जीवनसत्वाच्या अभावामुळे काही त्वचा विकारही उद्भवतात.
कोवळे ऊन असते 'ड' जीवनसत्वाचा स्रोत
सकाळचे कोवळे ऊन हा 'ड' जीवनसत्व मिळवण्याचा सर्वोत्तम स्रोत आहे. तुम्हाला जर गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यायलाच हवे.
सनस्क्रीनच्या वापरामुळे 'ड' जीवनसत्वावर होतो परिणाम
सनक्रीन विशेष करून SPF असलेले सनस्क्रीन हे 'ड' जीवनसत्वाला मारक ठरत आहे. अलीकडील संशोधनातून असे लक्षात आले आहे की सूर्याच्या ऊनामुळे शरीराला मिळणाऱ्या 'ड' जीवनसत्वाला सनक्रीन अडथळा निर्माण करतात. यामध्ये 'ड' जीवनसत्व नष्ट करण्याची क्षमता ९८ टक्के असते. त्यामुळे शरीरात 'ड' जीवनसत्वाची कमतरता होते.
याशिवाय सनस्क्रीन मधील काही रसायनांमुळे त्वचेला अॅलर्जी होऊ शकते. यामध्ये त्वचा रूक्ष होणे, खाज येणे, लाल चकते आणि सूज येणे असे प्रकार देखील होऊ शकतात.
काय आहेत उपाय?
शक्यतो तीव्र ऊन असताना बाहेर पडण्याचे टाळावे. यामुळे तुम्हाला सनस्क्रीन लोशन लावण्याची गरज पडणार नाही. सनस्क्रीन लावण्याची खूपच आवश्यकता असेल तर ते प्रथम तुमच्या त्वचेनुसार सनस्क्रीनची निवड करावी. तसेच सनस्क्रीन कमीत कमी लावावे. तसेच सकाळच्या कोवळ्या ऊनात फेरफटका निश्चितच मारावा ज्यामुळे शरीराला आवश्यक मात्रेत 'ड' जीवनसत्व मिळेल.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)