हृदयविकार, पक्षाघात रोखण्यात अ‍ॅस्पिरीनचा फायदा नाही

रोज अ‍ॅस्पिरीनची गोळी घेतल्याने हृदयविकार तसेच पक्षाघाताचा धोका कमी होत नाही किंबहुना त्यात...
हृदयविकार, पक्षाघात रोखण्यात अ‍ॅस्पिरीनचा फायदा नाही

रोज अ‍ॅस्पिरीनची गोळी घेतल्याने हृदयविकार तसेच पक्षाघाताचा धोका कमी होत नाही किंबहुना त्यात शरीराच्या हालचाली कमी होण्यापासून कुठलेही संरक्षण मिळत नाही, असे एका संशोधनात दिसून आले आहे. अ‍ॅस्पिरिन व त्याच्याशी संबंधित संयुगे ही वेदनेवरील उपचारासाठी ख्रि.पू. सोळाव्या शतकापासून वापरली जात आहेत. विलो व पेपीरसच्या बुंध्याचा भाग चावून खाल्ला तर वेदना कमी होतात असे दिसून आल्यानंतर १८९८ मध्ये अ‍ॅस्पिरिनचे संश्लेषण करण्यात आले होते व १९६० पासून या औषधाचा वापर हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी केला जात होता.

पक्षाघातावरही ते गुणकारी मानले जाते. न्यू इंग्लंड जर्नल आॅफ मेडिसीन या नियतकालिकाने याबाबत तीन अभ्यास प्रसिद्ध केले असून त्यात संशोधकांनी असे म्हटले आहे की, १०० मिलीग्रॅमची मात्रा दिली असता अ‍ॅस्पिरीनचा कुठलाही परिणाम आरोग्यवान लोकांवर होत नाही त्यामुळे हृदयविकार किंवा पक्षाघात टळत नाही.

आॅस्ट्रेलिया व अमेरिकेतील १९ हजार लोकांचा अभ्यास सात वर्षांत करून अ‍ॅस्प्री नावाचे संशोधन करण्यात आले असून त्यात अ‍ॅस्पिरिनच्या नियमित वापराने आरोग्य मिळण्याची हमी नसल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील प्राध्यापक जॉन मॅकनेल यांच्या मते आरोग्यासाठी अ‍ॅस्पिरिनच्या गोळ्यांचा काही फायदा नाही. अ‍ॅस्पिरिनमुळे आतडय़ात रक्तस्राव मात्र होतो तसे रुग्ण ३.८ टक्के आढळून आले. जगात अनेक वृद्ध लोक हृदयविकार व पक्षाघात टाळण्यासाठी अ‍ॅस्पिरिनच्या गोळ्या कुठल्याही सल्लयाशिवाय घेत असून ते चुकीचे आहे एवढाच या संशोधनाचा अर्थ आहे. अ‍ॅस्पिरिन खूप घातक नसले तरी वैद्यकीय सल्ल्याशिवाय ते सतत घेत राहणे योग्य नाही असे संशोधकांचे म्हणणे आहे. १०० मिलीग्रॅमची मात्रा दिली असता अ‍ॅस्पिरीनचा कुठलाही परिणाम आरोग्यवान लोकांवर होत नाही त्यामुळे हृदयविकार किंवा पक्षाघात टळत नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in