
तुमच्या पोटाचा घेर सातत्याने वाढत आहे, कंबर, मान आणि छातीच्या आजूबाजूच्या भागातील चरबी वाढत आहे? खूप उपाय करता पण काही केल्या ही चरबी कमी होत नाही? मग त्यामागे जेवणानंतर सहज केल्या जाणाऱ्या काही चुका कारणीभूत ठरू शकतात. अनेक लोक जेवण झाल्यानंतर काही छोट्या मोठ्या चुका करतात. ज्यामुळे त्यांचे वजन झपाट्याने वाढते. या चुका अनेकदा नकळत होतात, पण त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो. चला जाणून घ्या काय आहे या चुका?
1. जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिणे टाळा
अनेकांना जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते, पण ही सवय आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. चहा किंवा कॉफीमधील कॅफीन अन्नातील पोषणशक्ती कमी करते आणि पचनावरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे जेवणानंतर किमान 1 तासानेच चहा किंवा कॉफी घ्या.
2. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका
शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे, पण जेवणानंतर लगेच पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे पचनक्रियेला अडथळा निर्माण होतो आणि वजन वाढू शकते. त्यामुळे जेवणानंतर किमान ४० मिनिटांनंतरच पाणी प्या.
3. जेवणानंतर लगेच व्यायाम करू नका
जेवणानंतर हलकेसे चालणे आरोग्यासाठी चांगले असते, पण लगेच जोरदार व्यायाम केल्यास पचनावर परिणाम होतो. त्यामुळे जेवणानंतर काही वेळ विश्रांती घ्या आणि मग व्यायाम करा.
4. जेवणानंतर लगेच झोपू नका
जेवणानंतर लगेच आराम केल्यास किंवा झोपल्यास पचनक्रिया मंदावते. यामुळे अन्न नीट न पचता चरबीच्या स्वरूपात साठते. त्यामुळे जेवणानंतर किमान 30 मिनिटे कोणत्यातरी शारीरिक हालचाली केल्यावरच झोपा.
5. जेवणानंतर गोड खाणे टाळा
जेवणानंतर गुलाबजाम, आइसक्रीम किंवा कोणतेही गोड पदार्थ खाण्याची अनेकांना सवय असते. हे पदार्थ खाल्ल्यावर जेवणाचा स्वाद तर वाढतो, पण त्याचवेळी शरीराला जास्त कॅलरी मिळतात, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो सोबतच अतिरिक्त चरबी वाढते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)