
सध्याची जीवनशैली, ताणतणाव यामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. डोकेदुखीपासून दीर्घकाळ मुक्त राहण्यासाठी सोप्या उपायांचा अवलंब करणं गरजेचं आहे. जेव्हा डोकेदुखी होते, तेव्हा आयुष्य जणू काही थांबूनच जातं. तात्काळ आराम मिळावा म्हणून आपण झटपट औषधं घेतो. पण सतत अशा औषधांचा वापर केल्याने दीर्घकाळात शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच डोकेदुखी टाळण्यासाठी आणि ती कमी करण्यासाठी सोपे उपाय जाणून घेणं आवश्यक आहे. आयुर्वेद या त्रासाच्या मुळावर उपचार करतो.
डोकेदुखी का होते?
डोकेदुखी ही किरकोळ असो किंवा तीव्र स्वरूपात असू शकते. ती दुर्लक्ष करण्यासारखी नसते. ही एखादी वेगळी रोगस्थिती नसून इतर आरोग्य समस्यांचा इशारा असते. आयुर्वेदानुसार याची अनेक कारणं असतात. पाण्याचं कमी सेवन, पचनाचे त्रास, तणाव, तेलकट, तिखट व खूप खारट पदार्थांचं जास्त सेवन, अनियमित आहार यामुळे डोकेदुखी होते. सायनसही एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे डोकेदुखी कमी करणं किंवा ती टाळणं हे आरोग्यपूर्ण जीवनासाठी आवश्यक आहे.
डोकेदुखी टाळण्यासाठी ४ आयुर्वेदिक टिप्स:
१. काय खावं :
डोकेदुखीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. नारळपाणी, तुळशीचा चहा, ताज्या फळांचे रस यांचा आहारात समावेश करा. टरबूज, साखर घातलेलं दूध, तूप, सफरचंद, काकडी यांचा आहारात वापर करा. आलं, पुदिना, कोथिंबीर, अळू, जीरे, वेलची यांसारखी औषधी वनस्पती चक्कर येणं, मळमळ यावर फायदेशीर ठरतात.
२. मन शांत करा :
योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत राहतं. चंदन, पुदिना, निलगिरी, लॅव्हेंडर या सुगंधी तेलांचा वापर करा. डोक्यावर तेल लावून मालिश केल्याने रक्ताभिसरण वाढतं आणि डोके शांत राहते. थंड पाण्याचा शेक द्या. तसेच वेळेवर झोप घेणं अत्यावश्यक आहे.
३. सप्लिमेंट्स:
काही सप्लिमेंट्स डोकेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. व्हिटॅमिन बी१२ डोकेदुखीपासून आराम देतो. मॅग्नेशियम, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेऊ शकता. मात्र, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारचे सप्लिमेंट्स घेणे अपायकारक ठरू शकते.
४. काय टाळावं:
डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं आहे. सिगारेट, दारू, कॉफी आणि जंक फूड टाळा. तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी ओळखा आणि त्यापासून दूर राहा. अनियमित आहार आणि कामाची वेळा टाळा. डोकेदुखी कधीकधी येणं अटळ आहे, पण या सोप्या आयुर्वेदिक टिप्स फॉलो केल्याने ती सातत्याने होणारी समस्या ठरणार नाही, याची काळजी घेता येईल.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)