...म्हणून वेगवेगळ्या बँकेत पैसे ठेवावे; पश्चातापाची वेळ येणार नाही; जाणून घ्या एका बँकेत किती पैसे ठेवणे सुरक्षित?

अचानकपणे एखाद्या बँकेत मोठा घोटाळा उघडकीस येतो किंवा बँक बुडते किंवा बँक दिवाळखोर झाल्यास, बँकेत दरोडा पडल्यास अशा वेगवेगळ्या कारणांनी ग्राहकांना त्यांच्या खात्यातील पैसे काढता येत नाही. अशा परिस्थितीत काय कराल? जाणून घ्या बँकेत एका वेळी किती पैसे ठेवणे सुरक्षित...
...म्हणून वेगवेगळ्या बँकेत पैसे ठेवावे; पश्चातापाची वेळ येणार नाही; जाणून घ्या एका बँकेत किती पैसे ठेवणे सुरक्षित?
Freepik
Published on

आपले बचत केलेले मेहनतीचे पैसे आपण मोठ्या विश्वासाने बँक खात्यात जमा करतो. कधी तो मुदत ठेवीच्या स्वरुपात तर कधी बँकांच्या अन्य योजनांमध्ये सहभाग घेऊन हा पैसा गुंतवतो. आपला पैसा सुरक्षित राहील तसेच आपल्याला उत्तम परतावा मिळेल या आशेने आपण ही पूंजी बँकेजवळ सोपवत असतो. मात्र, समजा अचानकपणे एखाद्या बँकेत मोठा घोटाळा उघडकीस येतो किंवा बँक बुडते किंवा बँक दिवाळखोर झाल्यास, बँकेत दरोडा पडल्यास अशा वेगवेगळ्या कारणांनी ग्राहकांना त्यांच्या खात्यातील पैसे काढता येत नाही. अशा परिस्थितीत काय कराल? जाणून घ्या बँकेत एका वेळी किती पैसे ठेवणे सुरक्षित...

आरबीआयचे नियंत्रण

देशातील सर्व बँकांवर आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियंत्रण आहेत. मात्र, असे असले तरी बँकेने अनिर्बंध कर्ज देणे किंवा अन्य वेगवेगळ्या कारणास्तव बँकांमध्ये घोटाळे झाल्यास आरबीआय या बँकांवरील पुढील व्यवहारांवर निर्बंध लादते. नुकतेच न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेत मोठा घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर आरबीआयने कारवाई करत बँकेवर निर्बंध लादले. अशावेळी सर्वसामांन्यांनाही आपल्या खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध लादण्यात आले. अशा वेळी आपल्या मेहनतीचे पैसे बुडाल्याच्या भावनेमुळे अनेकजण तणावग्रस्त होतात. आरबीआयने यासाठी काही ठाराविक नियम आखून दिले आहेत.

काय आहेत आरबीआयचे नियम?

बँक बुडाल्यास आरबीआयचा नियम सांगतो की ग्राहकांना केवळ ५ लाखांपर्यंतचे पैसे परत मिळतात. हा नियम राष्ट्रीय, खासगी आणि सहकारी बँकांवर लागू आहे. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) तर्फे ग्राहकांच्या जमा रकमेचा विमा काढला जातो. ही रक्कम कोणत्याही स्वरुपातील असू शकते. ती बचत खात्यातील रकम असो किंवा मुदत ठेव रकम. तसेच हा नियम पतसंस्था आणि पतपेढींवरील ठेवींवर लागू नाही. या संदर्भातील नियम वेगळे आहेत.

यावर उपाय काय?

तुमची बचत जर ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर एकाच बँकेत ही रकम ठेवू नका. वेगवेगळ्या बँकांमध्ये बचत खाते उघडून तिथे ही रकम विभागून ठेवावी. परिणामी आपले कष्टाचे पैसे सुरक्षित राहतात. तसेच एखाद्या बँकेतून पैसे काढण्यासाठी आरबीआयने बंदी आणली तर दुसऱ्या बँकेतील खात्यातून तुम्ही तुमच्या गरजेचे पैसे काढू शकता.

logo
marathi.freepressjournal.in