
सुंदर दाट, मुलायम केस कोणाला नको असतात. प्रत्येकाला वाटते आपले केस दाट आणि मऊ असावे. त्यासाठी शॅम्पू, कंडिशनर, हेअर पॅक असे एक ना अनेक उपाय करतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही एका चांगल्या सवयीने देखील तुमचे केस सुंदर, दाट आणि मऊ करू शकतात. जाणून घ्या नेमकी कोणती सवय केसांचे सौंदर्य वाढवेल आणि केस मजबूतही होतील...
रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरणे
तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र, रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही केस व्यवस्थित विंचरले आणि छान वेणी घातली तर निश्चितच केसांचे आरोग्य उत्तम राहते. केस सुंदर आणि दाट होतात. जुन्या काळापासून ही गोष्ट आजीकडून सांगण्यात येते. लहानपणी आपण ते करतोही मात्र, नंतर धकाधकीच्या आयुष्यात धावपळीत ही सवय तुटत जाते. मात्र, ही सवय पुन्हा लावून घेणे तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
केसांच्या वाढीस उपयुक्त
जेव्हा तुम्ही रात्री तुमच्या टाळूला हलक्या हाताने कंघी करता तेव्हा टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढते. चांगले रक्तप्रवाह केसांच्या मुळांना अधिक ऑक्सिजन आणि पोषण प्रदान करते, ज्यामुळे केस मजबूत होतात आणि जलद वाढतात. रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरणे हे केसांना नैसर्गिकरित्या मालिश करण्यासारखे आहे ते सुद्धा - तेल न लावताही!
केसांमध्ये नैसर्गिक तेल पसरते
आपल्या टाळूमध्ये एक नैसर्गिक तेल (सेबम) तयार होते जे केसांना मऊ आणि चमकदार ठेवते. जेव्हा तुम्ही कंघी करता तेव्हा हे नैसर्गिक तेल मुळांपासून केसांच्या संपूर्ण लांबीपर्यंत पसरते, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसण्यापासून त्यांचा बचाव होतो. रात्री केलेली ही प्रक्रिया केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनिंग करण्याचे काम करते.
केसांचा गुंता दूर होतो, केस तुटणे थांबते
वारा, केशरचना किंवा हालचालीमुळे केसांमध्ये गुंता निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही केस न विंचरता झोपल्याने तुमच्या केसांमध्ये गुंत्याचे प्रमाण वाढते. परिणामी दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रश करताना ते तुटू लागतात. अशा परिस्थितीत, रात्री केसांना हलक्या हाताने कंघी केल्याने केसांच्या गाठी उघडण्यास मदत होते आणि केस तुटण्यापासून बचाव होतो.
चांगली झोप घेणे सोपे होते
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ब्रश केल्याने किंवा डोक्याला कंघी केल्याने केवळ केसांनाच मदत होत नाही तर मन शांत होण्यासही मदत होते. जेव्हा तुम्ही कंघी करून टाळूवर हलका दाब देता तेव्हा केसांसह डोक्यालाही आरामदायी मालिश मिळते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत मिळते आणि यामुळे शांत आणि गाढ झोप येते.
कोंडा आणि खाज सुटण्यापासून आराम मिळतो
झोपण्यापूर्वी कंघी केल्याने टाळूवरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत होते. यामुळे कोंड्याची समस्या हळूहळू कमी होते. तसेच, जर टाळूला खाज सुटत असेल किंवा कोरडेपणा येत असेल तर टाळूतील नैसर्गिक तेल सर्वत्र पसरल्याने आराम मिळतो. केस स्वच्छ करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी ही एक सोपी घरगुती पद्धत आहे.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)