
कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. उकाड्याने अंगाची लाही लाही होत आहे. उन्हामुळे शरीराचे डिहायड्रेशनचे प्रमाण खूप जास्त होत आहे. त्यातच फार जेवणाची इच्छा नसते. परिणामी सातत्याने फक्त थंड पदार्थ प्यावेसे वाटतात. मात्र, यामुळे आहार संतुलन बिघडण्याचा धोका असतो. त्यामुळे उन्हाळ्यात आहार घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. जेणेकरून शरीर हायड्रेट राहून ताजेतवाने राहील आणि अन्नातून पौष्टिक घटकही मिळतील. जाणून घ्या उन्हाळ्यात कोणते पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला जड वाटणार नाही. तसेच तुम्ही कायमच ताजेतवाने राहाल.
उन्हाळ्यात कोणता नाश्ता करावा?
उन्हाळ्यात सकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये शक्यतो सॅलडचा वापर मोठ्या प्रमाणात करावा. सॅलडमध्ये ताज्या कच्च्या भाज्या, फळभाज्या, जसे की काकडी, टोमॅटो इत्यादी यांचा नाश्ता असावा. काकडीमुळे पोट भरलेले राहील तसेच तुम्हाला जड ही वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही काम करण्यासाठी दिवसभर फ्रेश आणि ॲक्टिव्ह राहता.
दुपारच्या वेळेला आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा
उन्हाळ्यात दही आणि भाताचे मिश्रण अद्भुत असते. दही आणि भात हा एक पारंपारिक भारतीय खाद्यपदार्थ आहे जो उन्हाळ्यात दुपारी खाण्यास योग्य आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. तर भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात जे ऊर्जा प्रदान करतात. दही आणि भात हे देखील पोटासाठी खूप चांगले आहार आहे. यासोबतच ते खायलाही खूप हलके आहे. यामुळे पोटाचे पचन देखील व्यवस्थित राहते.
फळे आणि काजू
फळे आणि काजू हे हलके आणि पौष्टिक पदार्थ आहेत. जे उन्हाळ्यात दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळाने साधारण चारच्या सुमारास आहारात घेणे योग्य आहेत. फळांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. तर काजूमध्ये प्रथिने आणि निरोगी चरबी असतात जी ऊर्जा प्रदान करतात.
दुपारी तुम्ही जितके हलके अन्न खाल तितके उन्हाळ्यात तुमचे आरोग्य चांगले राहील. उन्हाळ्यात फळे तुम्हाला ताजेतवाने ठेवतात आणि आरोग्यासाठीही खूप चांगली असतात. उन्हाळ्यात टरबूज, खरबूज, संत्री, आंबा, द्राक्षे यांसारखी फळे खाऊन तुम्ही दिवसभर स्वतःला ताजेतवाने ठेवू शकता.
रात्रीच्या जेवणात कोणते अन्न असावे?
उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणात शक्यतो पचण्यासाठी हलके अन्न असावे. जवारीची किंवा तांदळाची छोटी भाकरी तुम्ही खाऊ शकता. या पचनासाठी सुलभ असतात. उन्हाळ्यात फार झणझणीत जेवण करू नये.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)