'केवायसी'साठी कॉल आलाय? सावध व्हा ! माटुंग्यात इस्टेट एजंटला घातला गंडा

'केवायसी अपडेट'च्या नावाखाली दररोज हजारो नागरिकांना कॉल करून फसवले जात आहे. त्यात अनेक उच्चविद्याविभूषितही सायबर गुन्हेगारांच्या गळाला अलगद लागत आहेत. अशीच एक घटना माटुंगा येथे उजेडात आली आहे.
'केवायसी'साठी कॉल आलाय? सावध व्हा ! माटुंग्यात इस्टेट एजंटला घातला गंडा
Published on

रवींद्र राऊळ/मुंबई

'केवायसी अपडेट'च्या नावाखाली दररोज हजारो नागरिकांना कॉल करून फसवले जात आहे. त्यात अनेक उच्चविद्याविभूषितही सायबर गुन्हेगारांच्या गळाला अलगद लागत आहेत. अशीच एक घटना माटुंगा येथे उजेडात आली आहे. बँकेतून बोलत असल्याची बतावणी करत एका तोतया बँक कर्मचाऱ्याने 'केवायसी अपडेट' करण्याच्या नावाखाली एका इस्टेट एजंटला लिंक पाठवून त्यावर 'क्लिक' करण्यास सांगितले. ही 'क्लिक' इस्टेट एजंटला चांगलीच महागात पडली. त्याचा मोबाईल हॅक केला गेलाच, तसेच त्याच्या क्रेडिट कार्डवरून परस्पर दहा लाखांचे कर्ज काढून त्यातून ७ लाख रुपये काढून घेण्यात आले.

'केवायसी अपडेट' करण्यासाठी कुणा अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि बँकेतून बोलत असल्याचे सांगत त्याने ऑनलाइन लिंकवर तपशील भरण्यासाठी अथवा ती क्लिक करण्यासाठी तुमच्याकडे आग्रह धरला तर त्वरित सावध व्हा. अज्ञाताची सूचना ऐकलीत, तर एका क्षणात तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. पण सावधगिरी बाळगलीत तर तुम्हाला पुढील आर्थिक अनर्थ टाळता येऊ शकेल.

'केवायसी' म्हणजेच 'तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या' ही एक नियामक प्रक्रिया बँकेसह सर्व वित्तीय संस्थांना ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी आवश्यक आहे. खरे तर ही प्रक्रिया टाळणे किंवा त्याचे पालन न करणे हे 'केवायसी' गुन्हे म्हणून ओळखले जातात. 'केवायसी अपडेट' करणे हे अपरिहार्य असते. त्यासाठी वित्तीय संस्था ही प्रक्रिया पार पाडेपर्यंत तुमच्या खात्यातील व्यवहार थांबवू शकतात. त्याचाच गैरफायदा घेत अथवा खाते बंद पडण्याची भीती दाखवत सायबर गुन्हेगार अनेकांच्या बँक खात्यावर डल्ला मारत आयुष्यभराची कमाई लंपास करीत आहेत.

'केवायसी' फसवणुकीत सायबर गुन्हेगार ओळख पडताळणी प्रक्रियांचा गैरवापर करून वैयक्तिक माहिती चोरत बेकायदेशीरपणे आर्थिक खात्यांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे खातेधारक तसेच उद्योग आणि वित्तीय संस्थांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. वास्तविक कोणतीही बँक 'ऑनलाइन केवायसी' अपडेट करत नाहीत त्यासाठी कागदपत्रे घेऊन बँकेत जावे लागते. म्हणून 'केवायसी अपडेट' करण्यासाठी कुणा व्यक्तीचा फोन आल्यास पुढील दक्षता घ्या.

काय कराल?

विनंती पडताळणे : कोणत्याही 'केवायसी अपडेट' विनंतीची खातरजमा करण्यासाठी तुमच्या बँकेशी किंवा वित्तीय संस्थेशी थेट संपर्क साधा.

अधिकृत संपर्क वापरा: बँकेत जाणे शक्य नसल्यास बँकेचे अधिकृत संकेतस्थळ अथवा बँकेचा संपर्क क्रमांक, हेल्पलाईन क्रमांक असा विश्वसनीय तपशील मिळवून त्यावर चौकशी करा.

तक्रार करा : जर तुम्हाला कोणत्याही सायबर फसवणुकीचा संशय आला, तर तुमच्या बँकेला किंवा वित्तीय संस्थेला त्वरित कळवा.

'केवायसी अपडेट' पद्धती तपासा : 'केवायसी' तपशील अपडेट करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पद्धतींबद्दल तुमच्या बँकेकडे चौकशी करा.

काय टाळाल?

तुमची माहिती गोपनीय ठेवा: कधीही तुमचे खाते लॉगइन तपशील, कार्ड माहिती, पीन, पासवर्ड किंवा ओटीपी कोणाशीही किंवा अनधिकृत वेबसाइट / अॅप्सवर शेअर करू नका.

कागदपत्रे सुरक्षित ठेवा : 'केवायसी' कागदपत्रे किंवा त्यांच्या प्रती अज्ञात किंवा अनोळखी व्यक्ती किंवा संस्थांसोबत शेअर करू नका.

संशयास्पद लिंक्स टाळा: मोबाइल किंवा ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या संशयास्पद आणि अनाहूत लिंकवर क्लिक करू नका.

logo
marathi.freepressjournal.in