‘सर्च इंजिन’वरील आंधळा विश्वास घातक; बनावट ‘वेबसाइट’चा सुळसुळाट ग्राहकांचे कापतोय खिसे
रवींद्र राऊळ/मुंबई
कोणतीही माहिती हवी असली की ‘गुगल’सारख्या ‘सर्च इंजिन’चा आधार घेण्याची सवय साऱ्यांनाच लागली आहे. अर्थात यात काही वावगे नसले तरी वापरकर्त्यांच्या या सवयीचा गैरफायदा घेत स्कॅमरनी येथेही रचलेले सापळे लक्षात घ्यावे लागतील. नाहीतर किती रकमेवर पाणी सोडावे लागेल, हे सांगता येणार नाही.
हक्काचे घर मिळवण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीत नशीब आजमावण्याच्या उद्देशाने म्हाडाच्या वेबसाइटवर गेलेल्या काही जणांना त्यावरील ‘लिंक’ क्लिक करून चांगलाच आर्थिक फटका बसला. कारण त्यांना सापडलेली म्हाडाची वेबसाइटच बनावट होती. लोकप्रिय हॉटेलचा संपर्क क्रमांक शोधून ऑर्डर देणे बऱ्याच ग्राहकांना महागात पडत आहे. कारण त्याही बनावट निघत आहे. कोणत्याही कंपनीचा ग्राहक सेवा क्रमांक हवा असेल तर लागलीच सारे ‘गुगलबाबा’ला शरण जात त्या कंपनीचे नाव ‘सर्च बार’मध्ये टाकतात आणि समोर येईल त्या ‘लिंक’वर क्लिक करून कंपनीची वेबसाइट उघडत त्यावरचा संपर्क क्रमांक फिरवतात. लक्षात ठेवा, धोका नेमका इथेच आहे. गुगलवर आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा ग्राहक सेवा क्रमांक बरोबरच असेल असे काही नाही. कारण सायबर गुन्हेगार लोकप्रिय कंपनीच्या वेबसाइटच्या ‘ॲड्रेस मॅप’वर जात ‘सजेस्ट ऑन एडिट’ हा पर्याय वापरुन आपला स्वत:चा संपर्क क्रमांक तेथे टाकतात. कोणी ग्राहक त्या वेबसाइटवर आल्यास त्यांना तिथे तोच क्रमांक दिसतो आणि त्यावर संपर्क साधला की सायबर गुन्हेगारांचे पुढील काम सोपे होते.
‘सर्च इंजिन फ्रॉड’ म्हणजे सायबर गुन्हेगारांकडून बनावट वेबसाइट अथवा लिंक वापरुन लोकांना फसवणे. येथे लोकांना त्यांची वैयक्तिक तसेच आर्थिक माहिती देण्यास भाग पाडले जाते. या नंबरवर नकळत कॉल करणाऱ्यांनी संवेदनशील माहिती उघड केली की आर्थिक नुकसानीसह इतर गंभीर परिणाम होऊ शकतात.
काय कराल ?
-अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट ठेवा : बँक अथवा कुठल्या वित्तीय संस्थेच्या वेबसाइटवर जायचे असेल तर थेट ब्राऊझरवर टाइप करून जा.
-अधिकृत वेबसाइटना भेट द्या : सर्च रिपोर्टवर अवलंबून राहण्याऐवजी संपर्क करण्याच्या तपशिलांसाठी नेहमीच अधिकृत वेबसाइट तपासा. अथवा दुकानांची बिले, पॅकेजवर असलेले खात्रीशीर सेवा क्रमांक शोधा.
-संपर्क तपशील नीट तपासा : वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी कॉलर आयडी किंवा विश्वसनीय डिरेक्टरी वापरून फोन नंबर आणि वेबसाइट पुन्हा तपासा.
-धोक्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवा : तातडीचे, घाबरणारे इशारे किंवा संशयास्पद ऑफरपासून सावध राहा. कायदेशीर कंपन्या घाईघाईने व्यवहार करण्यासाठी दबाव आणत नाहीत.
काय टाळाल ?
-सर्च रिपोर्टवर आंधळा विश्वास ठेवू नका : ‘सर्च इंजिन’ निकालांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या संपर्क क्रमांकावर खातरजमा केल्याशिवाय कधीही कॉल करू नका.
-अनावश्यक माहिती शेअर करू नका : तुम्ही योग्य ठिकाणी संपर्क केल्याची खात्री झाली असेल तरच फोनवर वैयक्तिक तपशील शेअर करा.
-बँक तपशील शेअर करू नका : कोणाशीही ओटीपी शेअर करू नका.