
मुंबई : सध्याच्या काळात खरेदी असो की बँकिंग, अशी बहुतांशी कामे ऑनलाइन होत असल्याने ओटीपी म्हणजे वन टाइम पासवर्ड हा एक तात्पुरता, सुरक्षित पासवर्ड अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. हा केवळ विशिष्ट वेळेसाठी किंवा व्यवहारासाठी वैध असतो. पण अतिशय खासगी ठेवण्यासाठी असलेला ओटीपी अन्य कुणाला सांगणे धोकादायक ठरते.
ऑनलाइन व्यवहार किंवा लॉगइन करताना स्वयंचलितपणे तयार होणारा ओटीपी तुमच्या मोबाईल क्रमांकावर किंवा ई-मेलवर पाठवला जातो. एकदा वापरल्यानंतर तो आपोआप बाद होतो. यामुळे तुमच्या खात्याची सुरक्षा वाढते. हा पासवर्ड तुमच्या खात्यात होणाऱ्या आगंतुकाच्या अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण करतो. ओटीपी का महत्त्वाचा आहे? तर तो तुमच्या खात्याला सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर जोडतो. तुमच्या ओळखीची पडताळणी करणाऱ्या ओटीपीमुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होते म्हणून, ऑनलाइन व्यवहार करताना ओटीपी वापरणे सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.
सध्या पासवर्ड किंवा यूजरनेम हॅकिंग करण्याचा धोका वाढतच आहे. म्हणून शेवटची स्टेप म्हणजे ओटीपी व्हेरिफिकेशन. ज्यामुळे पासवर्ड चोरी झाल्यावरही आपले खाते सुरक्षित राहते. आपले यूजरनेम आणि पासवर्ड एखाद्याकडे असल्यावरही तो आपल्या खात्यामधून व्यवहार करू शकत नाही, कारण त्यासाठी ओटीपी व्हेरिफिकेशन करणे महत्त्वाचे असते. ओटीपी दरवेळी बदलला जातो, जेणेकरून आपले खाते पूर्णपणे सुरक्षित ठेवते.
अनेकदा यूजरचे खाते असलेल्या बँकेत ओटीपी हवा आहे, असे खोटे सांगून ओटीपी मागितला जातो. पण खरी गोष्ट अशी की, कोणतीही बँक आपल्या ग्राहकांकडे ओटीपी मागत नाही. मोबाईल, ई-मेल किंवा अन्य कुठेही आलेला ओटीपी कधीही कोणालाही सांगू नये. अशा स्कॅमद्वारे आजवर कोट्यवधी रुपये उकळले गेले आहेत.
ओटीपी केवळ पैसे देतानाच लागतो. पैसे घेत असताना ओटीपीची गरज पडत नाही. अनेकदा यूजरला पैसे पाठवत असल्याचे आमिष दाखवून ओटीपी मागतिला जातो. हा फ्रॉड आहे. मात्र, पैसे देणाऱ्याकडे ओटीपी येत असतो, स्वीकार करणाऱ्याकडे नव्हे. म्हणून अशात आपली फसवणूक होण्याची पूर्णपणे शक्यता असते.
काय कराल?
अधिकृत ॲॅप्स किंवा वेबसाइटच वापरा : ॲॅप किंवा साइट अधिकृत नसल्यास ओटीपी ट्रॅक होऊन पैशाची चोरी केली जाते. या व्यतिरिक्त खासगी माहितीही लिक होते.
पेमेंट करताना सतर्क राहा : ओटीपीच्या माध्यमातून व्यवहार करताना त्या पेजचा स्रोत आणि व्यवहाराकडे लक्ष ठेवावे.
व्यवहार विश्वसनीय असल्याची खात्री करा : काहीही चुकीचे किंवा अव्यावहारिक आढळत असल्यास लगेच पेमेंट रद्द करावे..
काय टाळाल?
ओटीपी शेअर करू नका : बँकेच्या नावाने ओटीपीसाठी कॉल आल्यावरही कोणत्याही अटीवर तो सांगू नये.
हा गुन्हा आहे : ओटीपीविषयी माहिती मिळवणे हा कायद्याने अपराध आहे.