बाल्यावस्थेतील रक्त कर्करोग, जसे की ल्युकेमिया आणि लिम्फोमा, हे मुलांमध्ये आढळणारे सर्वात सामान्य कर्करोगांपैकी आहेत. जसे प्रौढांमध्ये कर्करोगाच्या वाढीमध्ये धूम्रपान किंवा आहार हे जीवनशैलीसारखे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात, तसे बाल्यावस्थेतील कर्करोग, रक्त कर्करोगासह बहुधा अनुवांशिक कारणांमुळे होतो. सप्टेंबर महिन्यात जागतिक बाल कर्करोग जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने अनुवांशिकतेची भूमिका समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे, ज्यामुळे पालकांना कर्करोग कसा होऊ शकतो आणि त्याच्या उपचार व प्रतिबंधासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे कळू शकेल. याबद्दल अधिक न्यूबर्ग सेहगल पॅथ लॅबचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य पॅथॉलॉजिस्ट, डॉ. कुणाल सेहगल यांच्याकडुन जाणून घ्या.
रक्तपेशींच्या डीएनएमध्ये झालेल्या अनुवांशिक बदलांमुळे पेशी अनियंत्रितपणे वाढतात, ज्यामुळे ल्युकेमिया सारख्या रक्त कर्करोगांचा विकास होतो. अनेक वेळा हे अनुवांशिक बदल पेशींच्या विभाजनादरम्यान स्वाभाविकरित्या होतात, आणि ते पालकांकडून मुलांकडे जात नाहीत. मात्र, काही मुलांना अशा अनुवांशिक स्थिती वारशाने मिळतात, ज्यामुळे रक्त कर्करोगाचा धोका वाढतो. डाउन सिंड्रोम, ली-फ्रॉमिनी सिंड्रोम आणि न्यूरोफायब्रोमॅटोसिस यांसारख्या स्थिती ल्युकेमिया किंवा इतर कर्करोगांचा धोका वाढवतात.
या अनुवांशिक स्थितींमध्ये डीएनए दुरुस्ती किंवा पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवणाऱ्या जनुकांवर परिणाम होतो. पालकांसाठी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, जरी अनुवांशिक संबंध असले, तरीही बहुतेक मुलांमध्ये रक्त कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास नसतो. अनेक प्रकरणांमध्ये विशिष्ट कारण अज्ञात राहते आणि पालकांकडून कर्करोगाचा थेट अनुवांशिक वारसा आढळत नाही. मात्र, संशोधन सतत हे उघड करत आहे की विशिष्ट अनुवांशिक बदल आणि सिंड्रोम्स कर्करोग होण्याची शक्यता कशी वाढवतात. चाचणी आणि लवकर निदान काही प्रकरणांमध्ये, ज्या मुलांना कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास आहे किंवा ज्या अनुवांशिक स्थितींमुळे कर्करोगाचा धोका वाढतो त्या मुलांसाठी अनुवांशिक चाचणीची शिफारस केली जाऊ शकते. अनुवांशिक चाचण्या अशा बदलांना ओळखू शकतात, ज्यामुळे मुलांना रक्त कर्करोगाचा धोका असू शकतो. जर हे बदल आढळले, तर डॉक्टर लवकर निदान आणि हस्तक्षेपाचे धोरण सुचवू शकतात, ज्यामुळे संभाव्य समस्यांचे वेळेत निदान होऊन लवकर उपाययोजना करता येऊ शकतात.
उपचारासाठी अनुवांशिकतेचे परिणाम
अनुवांशिक घटक बाल्यावस्थेतील रक्त कर्करोगाच्या उपचारांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावतात. काही अनुवांशिक बदलांमुळे कर्करोग केमोथेरपी किंवा टार्गेटेड उपचारांना कसा प्रतिसाद देईल यावर परिणाम होतो. मुलाच्या अनुवांशिक प्रोफाइलनुसार वैयक्तिकृत उपचार योजना आता सामान्य होत आहेत आणि यामुळे उपचारांचे यश अधिक सुधारण्याची शक्यता असते. पालकांसाठी, बाल्यावस्थेतील रक्त कर्करोगाशी संबंधित अनुवांशिक घटकांची माहिती महत्त्वाची ठरते. जरी अनुवांशिकता कर्करोगाच्या विकासामध्ये काही अंशी जबाबदार असू शकते, तरी लवकर निदान आणि वैयक्तिकृत उपचारांच्या माध्यमातून बरी होण्याची शक्यता नक्कीच वाढते. जर तुमच्या मुलाला रक्त कर्करोगाचा धोका असेल किंवा निदान झाले असेल, तर बालकांच्या कर्करोग तज्ज्ञ आणि अनुवांशिक सल्लागारांशी सल्लामसलत करून चाचणी, उपचार आणि दीर्घकालीन काळजीबाबत योग्य मार्गदर्शन मिळवणे खूपच उपयुक्त ठरेल.