
नवी दिल्ली: डॉक्टरांनी दिलेली रक्तदाबावरील औषधे कितपत परिणामकारक ठरतील याचे मोजमाप करता येईल, असे ऑनलाइन यंत्र संशोधकांनी विकसित केले आहे. या साधनामुळे रुग्णांच्या गरजेनुसार उपचार अधिक नेमकेपणाने ठरवता येण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया आणि भारतातील दि जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थमधील संशोधकांसह एका टीमने प्रकाशित झालेल्या अभ्यासांचे (एक लाखांहून अधिक सहभागींचे) पुनरावलोकन आणि विश्लेषण केल्यानंतर हे साधन विकसित केले.
'द लॅन्सेट' नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखात वर्णन केल्याप्रमाणे, 'ब्लड प्रेशर ट्रीटमेंट एफिकसी कॅल्क्युलेटर' डॉक्टरांना रुग्णाच्या रक्तदाबात किती घट होणे आवश्यक आहे, यावर आधारित औषधे लिहून देण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
"हे खूप महत्त्वाचे आहे कारण सिस्टोलिक रक्तदाबात (वरचा आकडा) प्रत्येक १ एमएमएचजीने घट झाली की हृदयविकाराचा झटका किंवा झटका होण्याचा धोका २ टक्क्यांनी कमी होतो," असे या अभ्यासाचे लेखक व ऑस्ट्रेलियातील दि जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थचे कार्डिओलॉजिस्ट व रिसर्च फेलो नेल्सन वांग यांनी सांगितले.
"पण डझनभर औषधे,प्रत्येकासाठी वेगवेगळ्या डोस, आणि बहुतेक रुग्णांना दोन किंवा अधिक औषधांची गरज असल्याने हजारो पर्याय तयार होतात आणि त्यांचा प्रभाव किती असेल याचा सोपा मार्ग उपलब्ध नव्हता," असे ते म्हणाले.
संशोधकांनी सांगितले की, उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी औषधे हा सर्वात सामान्य मार्ग आहे. एखादे औषध एकटे घेतल्यास ते सरासरी आठ ते नऊ एमएमएचजीने रक्तदाब कमी करते. मात्र बहुतेक रुग्णांना १५ ते ३० एमएमएचजीने रक्तदाब कमी करणे आवश्यक असते.
औषधाचा किती परिणाम होईल हे मोजण्यासोबतच हे ऑनलाइन साधन उपचाराला 'कमी', 'मध्यम' किंवा 'जास्त' तीव्रतेच्या प्रकारात वर्गीकृत करते.
संशोधकांनी विश्लेषण केलेल्या चाचण्यांमध्ये प्रौढांना बीटा-ब्लॉकर्स आणि कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स यांसारख्या औषधांचे डोस देण्यात आले होते.
सरासरी, एखादे औषध ठराविक डोसमध्ये घेतल्यास ते सिस्टोलिक रक्तदाबात ८.७एमएमएचजी घट घडवून आणते, तर डोस दुप्पट केल्यास आणखी १.५ एमएमएचजीने घट होते.
औषधांच्या कोणत्याही संयोजनासाठी प्रभावकारिता मोजण्यासाठी मॉडेल तयार केले गेले आणि ते द्वैती व तिहेरी औषधांच्या संयोजनांवरील बाह्य चाचण्यांमध्ये पडताळून पाहिले गेले, असे लेखकांनी म्हटले.
पुढील टप्प्यात, हा कॅल्क्युलेटर प्रत्यक्ष रुग्णांवरील क्लिनिकल ट्रायल्समध्ये तपासण्यात येईल, असे संशोधकांनी सांगितले.
रक्तदाब होतो कमी
दोन औषधांच्या संयोगाने रक्तदाब साधारण १५ एमएमएचजीने कमी झाला, आणि दोन्ही औषधांचा डोस दुप्पट केल्यास २.५ एमएमएचजीने अतिरिक्त घट झाली.