
BMW Motorrad India ने भारतातील आपल्या सर्वात स्वस्त मोटारसायकल BMW G 310 R ही आणि G 310 GS ही ची विक्री थांबवली आहे. या दोन्ही बाईक भारतात २०१८ मध्ये लॉन्च करण्यात आल्या होत्या आणि TVS-BMW च्या भागीदारीत तमिळनाडूतील होसुर प्लांटमध्ये तयार केल्या जायच्या. तथापि, या दोन्ही बाईक्सची विक्री थांबवल्याबबात कंपनीने अद्याप औपचारिक घोषणा केलेली नाही.
बंद करण्याचं कारण काय?
या दोन बाईक्स बंद झाल्यामुळे, BMW G 310 RR (TVS Apache RR 310 चे रिबॅज्ड व्हर्जन ) ही कंपनीची आता सर्वात स्वस्त बाईक असणार आहे. १ एप्रिल २०२५ पासून लागू झालेल्या OBD-2B उत्सर्जन नियमांचे पालन करणे, आणि विक्रीतील घट हे या दोन्ही बाईक्स बंद करण्यामागचे प्रमुख कारण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. BMW च्या या दोन्ही बाइक्स 300-500cc सेगमेंटमध्ये आल्या होत्या. सध्या हे सेगमेंट भारतात लोकप्रिय झाले असून G 310 R आणि GS ला KTM 390 Duke, Honda CB300R आणि Kawasaki Z300 सारख्या बाईक्सकडून तगड्या स्पर्धेचा सामना करावा लागला आणि विक्रीच्या बाबतीत तितकेसे यश मिळाले नाही. विक्री घसरल्यामुळे कंपनीने या बाईक्स हटवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
BMW G 310 R सर्वप्रथम २०१५ मध्ये जगासमोर सादर करण्यात आली होती. TVS आणि BMW मधील ही पहिली भागीदारी होती. यानंतर G 310 GS ही अॅडव्हेंचर बाईक आली. या दोन्ही बाईक भारतात लॉन्च होण्यापूर्वीच त्यांची निर्यात सुरू झाली होती. २०१८ मध्ये भारतातील लाँचिंग झाले होते. G 310 R आणि G 310 GS दोन्हीमध्ये 313cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन असून हे इंजिन 34 bhp पॉवर आणि 28 Nm टॉर्क देते. यात 6-स्पीड गिअरबॉक्स, ड्युअल चॅनल एबीएस, समोर USD फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन होते. भारतीय बाजारात G 310 R ची २.९० लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि G310GS ची ३.३० लाख रुपये ( एक्स-शोरूम) किंमतीत विक्री होत होती.