उन्हाळ्यात करा कच्च्या कांद्याचा आहारात समावेश; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

तुमच्या जेवणाच्या ताटात एक छोटा कच्चा कांदा असायलाच पाहिजे. कांदा हा थंड गुणांचा असल्यामुळे उन्हाळ्यात कच्च्या कांद्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे.
उन्हाळ्यात करा कच्च्या कांद्याचा आहारात समावेश; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
Freepik
Published on

मार्च महिना सुरू आहे. उन्हाळा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अशातच आपण शरीराला गारवा मिळावा यासाठी प्रयत्न करतो. त्याप्रमाणे आहार घेतो. उन्हाळ्यात अनेक जण सॅलड, फळे, फळांचा रस, सरबत हा आहार घेण्याकडे मोठा कल असतो. मात्र, तुमच्या जेवणाच्या ताटात एक छोटा कच्चा कांदा असायलाच पाहिजे. कांदा हा थंड गुणांचा असल्यामुळे उन्हाळ्यात कच्च्या कांद्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

कांद्याचे गुणधर्म

सर्वप्रथम कांद्यातील पोषक तत्वे आणि गुणधर्म जाणून घेऊया. कच्च्या कांद्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. कच्चा कांदा हा थंड गुणांचा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे फायदेशीर ठरते.

हृदयाचे आरोग्य सुधारते

कच्चा कांदा हृदयरोग रोखण्यास मदत करू शकतात. कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तप्रवाह सुधारतो. यातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयरोगापासून बचाव करते.

साखर नियंत्रित करते

कच्चा कांदा रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच अंशी नियंत्रित करते. त्यामुळे एक छोटा कांदा आहारात असणे आवश्यक आहे.

गॅस आणि बद्धकोष्ठाची समस्या दूर

तुम्हाला जर सातत्याने गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर ही समस्या कच्चा कांदा खाल्ल्याने दूर होऊ शकते. कच्चा कांदा हा पचनसंस्था सुधारण्यास मदत करतो. त्यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच याच्या थंड गुणधर्मांमुळे पोटातील उष्णता कमी होण्यसाठी मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे तुमचे शरीर उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करते.

अॅलर्जीपासून बचाव

कच्च्या कांद्यात अॅलर्जीपासून बचाव करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे कच्चा कांदा आहारात नियमित समावेश करणाऱ्यांना शक्यतो कुठलीही अॅलर्जी होत नाही.

कच्चा कांदा खाण्याचे प्रमाण

कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. मात्र, याचे प्रमाण अत्यल्प असायला हवे. तसेच कच्चा कांदा हा दुपारच्या जेवणात असावा. कारण दुपारी कडक ऊन असते. तर रात्रीच्या वेळी कच्चा कांदा आहारात घेऊ नये. यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in