Breastfeeding Week 2024: मातेचे दूध बाळासाठी अमृतच; १ ते ७ ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह

जागतिक आरोग्य संघटनेने १९९० पासून १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यास सुरवात केली.
Breastfeeding Week 2024: मातेचे दूध बाळासाठी अमृतच; १ ते ७ ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह
Published on

दीपक भिसे/ जव्हार

पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या अनेक कल्याणकारी योजनेतून येथील नागरिकांना उपलब्ध साधनसामग्रीचा व मनुष्यबळाच्या सहाय्याने आरोग्य सुविधा पुरविली जात आहे. दरम्यान १ ते ७ ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह असल्याने जिल्हाभर याबाबत शिबिराचे आयोजन करून जनजागृती केली जात आहे. परिणामी येथील मातांना आता बाळाला स्तनपान करण्याचे महत्त्व पटत असून यामुळे बाळांची वाढ देखील चांगली होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने १९९० पासून १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यास सुरवात केली. 'आईचे दूध' हे बाळासाठी जणू अमृतच असते. नऊ महिने आपल्या गर्भात ठेवून, बाळाला जन्माला घालणारी आईची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही; परंतु अलीकडे आपली फिगर टिकविण्याच्या लालसेपायी अनेक माता आपल्या नवजात बाळाला वरचे म्हणजे गाई किंवा म्हशीचे दूध देतात. त्यामुळे बाळाला पौष्टिक अन्न मिळत नाही. याचा अर्थ गाई किंवा म्हशीचे दूध वाईट आहे, असा नाही तर वाढत्या वयात लहान मुलांना या पाळीव प्राण्यांचे दूध पोषकच ठरते असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी सांगितले.

स्तनपानाचे मातांना होणारे फायदे

  • १ स्तनपानामुळे स्तन कर्करोगाचे प्रमाण कमी होते.

  • २ बाटलीने दूध भरणाऱ्या मातांच्या तुलनेत स्तनपान करणाऱ्या मातांना कमीत कमी कालावधीत वजन कमी करण्यास मदत होते.

  • ३ आई आणि बाळाचे नाते दृढ होण्यास मदत.

स्तनपानातून मिळणारे दूध हे अर्भकासाठी सर्वोतम पेय आहे. हे दूध म्हणजे जीवनसत्त्व, प्रथिने आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी चरबी या सर्व घटकांचा योग्य मिलाप असते. त्यात बरीच प्रतिबंधात्मक द्रव्ये असतात. ज्यामुळे बाळाची प्रतिकारक्षमता वाढीस लागते आणि बाहेरील जंतुसंसर्गापासून, एलर्जी यांसारख्या रोगांचा प्रतिकार करणे शक्य होते.

- डॉ. रामदास मराड, जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर

आईचे दूध हे बाळासाठी संपूर्ण आहार

नवजात बाळाला मात्र, सुरुवातीपासूनच स्तनपान करविणे हे बाळासाठी एक नैसर्गिक वरदान आहे, नव्हे बाळासाठी ते जीवनामृत आहे. नवजात बाळाला स्तनपान करणे ही एक आवश्यक बाब आहे. बाळाच्या वाढीसाठी आईचे दूध अत्यंत गरजेचे व उपयुक्त असते. आईच्या दुधात जे सामर्थ्य आहे ते जगातील कोणत्याही घटकात नाही. नवजात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्ये मातेच्या दुधात समाविष्ट असतात. त्या दुधात बाळाच्या रोगप्रतिकारक क्षमता वाढीसाठी उपयोगी घटक असतात. म्हणूनच मातेचे दूध हे बाळासाठी संपूर्ण आहार आहे.

चिकाच्या दुधातूनच रोगप्रतिकार क्षमतेत वाढ

बाळ जन्मल्यानंतर लवकरात लवकर मातेचा व बाळाच्या त्वचेला एकमेकाला स्पर्श करावा. एका तासाच्या आत स्तनपानाची सुरुवात करावी. पहिल्या एका तासापासूनच त्याला आईचे दूध देणे आवश्यक ठरते. त्या चिकाच्या दुधातच रोगप्रतिकार क्षमता वाढीसाठी लागणारे उपयोगी घटक असतात. सहा महिन्यांच्या आतील बाळाला निव्वळ स्तनपान सुरू ठेवावे. निदान दोन वर्षे आईच्या दुधासोबत पूरक अन्न त्याला मिळायला हवे, तर त्याची सुदृढ वाढ होत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in