Bridal Jewellery: लग्नात नवीन लूक हवाय? मग नववधूंनो तुमच्याकडे 'हे' मल्टीफंक्शन दागिने असायला पाहिजेत

Bridal collection: मोठ्या सोहळ्यांपासून ते घरगुती कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी सहज शोभतील असे दागिने निवडून नववधू तिला अपेक्षित लूक मिळवू शकते.
Bridal Jewellery: लग्नात नवीन लूक हवाय? मग नववधूंनो तुमच्याकडे 'हे' मल्टीफंक्शन दागिने असायला पाहिजेत
Published on

Bridal Multifunction Jewelry Styling Tips: नववधूच्या नटण्यासजण्यामध्ये वैविध्यपूर्णता ही अत्यंत महत्त्वाची असते, विशेषत: पावसाळी मोसमामध्ये तर अशा विविधतेची गरज अधिकच भासते. नवरीने निवडलेल्या दागिन्यांमध्ये तिला चिंतामुक्त वाटले पाहिजे आणि त्याचवेळी या दागिन्यांमध्ये सुंदरही दिसायला हवी. यासाठीची एक स्मार्ट युक्ती म्हणजे अशा दागिन्यांची निवड करणे जे लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये, इतर सोहळ्यांमध्ये आणि रिसेप्शनपर्यंत विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे घालता येतील. यामुळे नववधू कोणत्याही काळजीशिवाय आपल्या स्टायलिश व्यक्तिमत्त्वामध्ये उठून दिसू शकेल. शिवाय दागिन्यांचा खर्च बजेटमध्ये ठेवण्याचा हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. मान्सूनच्या या दिवसांत खूप सारे दागिने निवडत, सांभाळत बसण्याऐवजी कमाल परिणाम साधणारे मोजकेच दागिने जवळ बाळगणे कधीही चांगले.

मोठ्या सोहळ्यांपासून ते घरगुती कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी सहज शोभतील असे दागिने निवडून नववधू तिला अपेक्षित लूक मिळवू शकते. शिवाय, अशा बहुपयोगी दागिन्यांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या समारंभांतील वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणाशीही सहज जुळवून घेता येते, जसे की जड दागिन्यांऐवजी हलकेफुलके दागिने निवडणे किंवा सोहळ्याच्या वेगवेगळ्या भागांसाठी एखादा स्टेटमेंट पीस वेगळ्या प्रकारे वापरणे. या लवचिकपणामुळे अधिक सहजपणा येईल आणि नववधूला तिच्या आयुष्यातील या खास दिवशी पूर्णवेळ आत्मविश्वासाने वावरता येईल व त्यामुळे हवामानाची फार चिंता न करता सोहळ्याचा आनंद अनुभवण्यावर लक्ष केंद्रित करता येईल. याबद्दल अधिक जाणून घेऊयात पु.ना.गाडगीळ अँड सन्सचे सीओओ व सीएफओ आदित्य मोडक यांच्याकडून...

कर्ण आणि केशभूषण

आपल्या खास दिवसासाठी स्टेटमेंट इअररिंग्ज निवडून नववधू आपला लूक बदलून टाकू शकते. समारंभाच्या वेळी ही कर्णाभूषणे नेहमीप्रमाणे वापरता येतील. आणि नंतर, रिसेप्शनच्या वेळी ती हेच इअररिंग्ज केसांमध्ये आभूषित करून एक आगळावेगळा, नजरेत भरणारा लूक तयार करू शकते. हे करण्याची एक लोकप्रिय पद्धत म्हणजे त्यांना केशरचनेमध्ये सजविणे, वेणीमध्ये अडकविणे किंवा केसांच्या खोप्यामध्ये खोवणे. काही नववधू उलगडत्या लडींसारख्या नक्षीचे इअररिंग्ज निवडतात किंवा काहीजणी केसांमध्ये लहरींसारख्या दिसतील अशा कर्णाभूषणांच्या नाजूक साखळ्या निवडतात, ज्यामुळे एक रमणीय आणि स्वप्नील भावना व्यक्त होते. नववधूला अभिरूचीपूर्ण, अभिजात, आधुनिक किंवा पारंपरिक शैलीतील असे कोणतेही दागिने आवडले तरीही आपल्या खास दिवसासाठी तिने अशीच कर्णाभूषणे निवडली पाहिजेत, ज्यातून तिचे व्यक्तीमत्व आणि तिची स्टाइल व्यक्त होईल.

अँक्लेट्स/पैंजणांचा ब्रेसलेट्स म्हणून वापर

नववधूंना काही खास अर्थ असलेल्या चार्म्सचा वापर करून भावनिक मूल्य असणारे स्वत:चे खास पैंजण बनवून घेता येतील, किंवा नाजूक गुंतागूंतीची नक्षी, घुंगरू किंवा खड्यांची सजावट असलेले पैंजणही निवडता येतील. त्यातील रंग अशाप्रकारे निवडता येतील, जेणेकरून ते एकाच नव्हे तर दोन वेगवेगळ्या प्रसंगांना वापरता येतील. जसे की मेंदीच्या कार्यक्रमाला आणि हळदीलाही वापरता येतील. तेच पैंजण अनेक बांगड्यांच्या साथीने हातात घालता येतील किंवा ब्रेसलेट म्हणून मनगटात परिधान करता येतील किंवा स्वत:चे वेगळे स्टेटमेंट असलेला दागिना म्हणून वापरता येईल. यामुळे नववधूला आपली कल्पकता आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लोकांसमोर आणता येईल. त्यांना ही अँक्लेट्स मनगटावर किंवा वर दंडावर किंवा इतर ब्रेसलेट्सच्या साथीने अनेक पदरी रचना करून वेगवेगळ्या प्रकारे घालण्याचे प्रयोग करून पाहता येतील. या वैविध्यपूर्णतेमुळे त्यांना आपल्या सांस्कृतिक परंपरांशी असलेले नाते जपतानाच एक आगळावेगळा लूक तयार करण्याची संधी मिळेल.

मांग टिक्क्याचा ब्रोच किंवा ब्रोचचा मांग टिक्का

नववधूला सुंदर मांग टिक्क्याची निवड करता येईल आणि तो आपल्या कपाळावर पारंपरिक पद्धतीने सजवता येईल. त्यानंतर रिसेप्शनसाठी ती हाच मांग टिक्का आपल्या ड्रेप्ड गाऊन किंवा साडी गाऊनसारख्या आधुनिक पद्धतीच्या पेहेरावाबरोबर वापरून त्याला स्टाइलजी जोड देता येईल. हा मांग टिक्का तिच्या कपड्यांना, गळपट्टीच्या जवळ किंवा साडीच्या पदराला नीट अडकवता येईल. यामुळे पेहराव अधिक चमचमता बनेल, त्याला एक सुंदर तपशील जोडला जाईल आणि त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसेल. दुसऱ्या बाजूला ब्रोचेचाही वापर मांग टिक्का म्हणून करता येईल. आपली वेगळी छाप पाडणारे स्टेटमेंट ब्रोचेस हेअरपिन्स किंवा छोटे क्लिप्स वापरून केसांच्या मध्यभागी भांग पाडलेल्या ठिकाणी नजाकतीने लावता येईल. असे केल्याने नववधूला एक अविस्मरणीय लूक तयार करता येईल आणि तिच्या स्टायलिंगमधील कौशल्याच्या चर्चा रंगतील.

कंबरपट्ट्याचा नेकलेस

एखाद्या स्टेटमेंट पीसचा शैलीदारपणे वापर करण्याचा एक कल्पक मार्ग म्हणजे त्याला लग्नसोहळा आणि रिसेप्शन अशा वेगवेगळ्या प्रसंगी दोन प्रमुख दागिने म्हणून वापरणे. पारंपरिक पद्धतीने कमरेभोवती घातला जाणारा हा कंबरपट्ट्यावर अत्यंत नाजूक गुंतागूंतीच्या नक्षी असतात, ज्यावर केलेल्या खडे किंवा मोत्यांच्या सजावटीमुळे त्याला अधिक ग्लॅमर मिळते. लग्नसोहळ्याच्या वेळी हा कंबरपट्टा पारंपरिक पद्धतीने घालता येईल. आणि रिसेप्शनमध्ये हाच कंबरपट्टा नेकलेस किंवा लांब माळेसारखे परिधान केल्यास त्याचा एक नजरेत भरणारा स्टेटमेंट दागिना बनून जाईल. कंबरपट्ट्याला नेत्रदीपक नेकलेसचे रूप देण्यासाठी त्याला गळ्याभोवती काही वेढे देऊन अनेकपदरी दागिन्याच्या रूपात तो परिधान करता येईल. नववधूंना हाच कंबरपट्टा एकाच लांब चेनप्रमाणेही घालता येईल, जो त्यांच्या पेहरावावर अत्यंत शैलीदारपणे खाली रुळेल.

पेन्डन्ट्सचा चार्म्स म्हणून वापर

नववधूसाठी ही पसंतीची किंवा भावनिक निवड ठरू शकते. विशिष्ट तारीख लिहिलेली हृदयाची नक्षी, प्रिय व्यक्तीच्या नावाची आद्याक्षरे किंवा तिच्यासाठी काही विशेष अर्थ असलेली फुलपाखरू किंवा तत्सम काही आकृती अशा तिच्या मनात काही खास अर्थ असलेल्या नक्षीचे पेंडन्ट ती घालू शकते. संगीत किंवा अशा एखाद्या लग्नपूर्व सोहळ्यामध्ये ती हे पेंडन्ट घालू शकते, इतर सोहळ्यांमध्ये चार्म्स म्हणून वेगळ्या प्रकारे वापरू शकते आणि आणि खुद्द लग्नाच्या दिवशी बांगडीचा एक भाग म्हणून किंवा अगदी पैंजणातही त्याचा वापर करू शकते. ही अर्थपूर्ण पेंडन्ट्स ती आपल्या नववधूच्या पेहरावासोबत घेतलेल्या क्लच किंवा पर्सलाही लटकवू शकते. अशाप्रकारे तिला ही चिन्हे किंवा संदेश संपूर्ण दिवसभर आपल्यासोबत बाळकता येईल आणि तिच्या ब्रायडल लूकला एक खासगीपणाचा स्पर्श मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in