
परीक्षा संपल्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. बच्चे कंपनी फ्री झाली त्यामुळे पालकांनाही आता थोडी उसंत मिळणार आहे. सहकुटुंब एकत्रित रित्या फिरण्याचा हाच काळ असतो. अनेकांना फिरण्यासाठी कुठेतरी लांब जायचे असते. (Summer Vacation Planning ) उन्हामुळे अनेक जण सामान्यपणे हिलस्टेशन अर्थात थंड हवेचे ठिकाण शोधत असतात. जेणेकरून आल्हाददायक गारवा मिळावा. मात्र, सगळ्यांसमोर बजेट हा मोठा प्रश्नच असतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत कमी खर्चात फिरण्यासाठी (money management) या काही खास टिप्स आहेत. जेणेकरून तुमच्या पैशांची बचत होईल.
सुट्ट्यांचे दिवस किती?
बच्चे कंपनी किंवा युवा विद्यार्थी फ्री झाले असले तरी नोकरी करणाऱ्यांसमोर एकूण किती दिवसांची सुट्टी मिळणार आहे. याचा प्रश्न मोठा असतो. त्यामुळे सुट्ट्यांचे दिवस शक्यतो शनिवार, रविवार जोडून घ्यावे. जेणेकरून दोन दिवस अधिकची सुट्टी मिळते. तसेच सुट्टी किती दिवसांची आहे यावर फिरण्याचे ठिकाण निवडावे. जेणेकरून प्रवासाचा वेळ वाचेल.
लांब अंतरावरील ठिकाण निवडताना
लांब अंतरावरील ठिकाण निवडताना तिथे जाणाऱ्या गाड्यांची उपलब्धता, तिकीट, इत्यादी गोष्टींची आधीच माहिती करून घ्यावी. कारण सुट्ट्यांमुळे भाडे दुप्पटीने वाढते. त्यामुळे आगाऊ बुकिंग केलेले केव्हाही चांगले. त्यामुळे न थकता उत्तम प्रवास करता येतो.
ऑफर्सकडे लक्ष ठेवा
सुट्ट्यांसाठी अनेक ट्रॅव्हल कंपन्यांकडून विविध ऑफर तिकीट बुकिंसाठी दिल्या जातात. यावर लक्ष ठेवावे. त्याचा निश्चितच फायदा होतो.
गंतव्य स्थळाविषयी संपूर्ण माहिती काढावी
आज डिजिटल युगामुळे तुम्ही कोठेही फिरायला जा त्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मोबाईलवर एका क्लिकवर मिळते. जिथे जाणार असाल तेथील संपूर्ण माहिती काढून घ्यावी. जेणेकरून त्या भागात कमीत कमी खर्चात राहण्याची उत्तम सोय कशी होईल याची माहिती मिळते. इंटरनेवरून संबंधित ठिकाणाविषयी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी आहे. याची नीट माहिती काढल्यास ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी याचे भरपूर पैसे वाचतात.
कमीत कमी खर्चात राहण्यासाठी
तुम्हाला राहण्यासाठी कमी खर्च करायचा असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात त्याच्या जवळपास कुठे तीर्थस्थळ आहे का ते शोधावे. कारण अनेक धार्मिक ठिकाणी तीर्थक्षेत्र विकासकामांतर्गत अतिशय कमी खर्चात उत्तमोत्तम राहण्याची सुविधा मिळते. यामुळे पैसे वाचतात. जे पुढील ट्रिपमध्ये उपयोगी पडू शकतात.
शॉपिंग काय करावी?
एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर शक्यतो त्या ठिकाणी स्थानिक कारागिरांनी निर्माण केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती खरेदी करण्यावर भर द्या. ज्या गोष्टी आपल्याही गावात किंवा ऑनलाइन सहज उपलब्ध आहेत, अशा वस्तूंवर शक्यतो पैसे वाया घालवू नये.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)