कोंड्यामुळे वैतागलाय? कापराचे तेल वापरा, केसांमधील बुरशीजन्य संसर्ग होईल दूर; लांब केसांसाठीही फायदा

कोंड्यामुळे वैतागलाय? कापराचे तेल वापरा, केसांमधील बुरशीजन्य संसर्ग होईल दूर; लांब केसांसाठीही फायदा

हे तेल केसांच्या फोलिकल्ससाठी देखील फायदेशीर असून केसांच्या वाढीसाठीही मदत करते.

सध्याचा काळ ऋतुबदलाचा आहे. सहाजिकच या दिवसांमध्ये त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. केसांशी संबंधित समस्यांमध्ये कोंडा ही सर्वात सामान्य समस्या असली तरी ती अनेकींची रात्रीची झोप उडवू शकते. यामुळे अनेकवेळा लाजिरवाणेपणाला सामोरे जावे लागते. कोंड्याची समस्या केव्हाही उद्भवू शकत असली तरी या काळात ही समस्या अधिक तीव्रतेने जाणवते. या दिवसांमध्ये गरम पाण्याची आंघोळ कमी होते आणि आपण गार पाण्याची आंघोळ सुरू करतो. मात्र पाणी जड असल्यास टाळूच्या त्वचेवरील आर्द्रता कमी होते आणि या कोरडेपणामुळे कोंड्याची समस्या उद्भवते. कोंडामुळे डोक्यात खाज येण्याची समस्याही तशी सामान्यच म्हणावी लागेल. मात्र यामुळे केस तुटण्याचा धोका वाढतो. म्हणूनच यावर वेळीच उपाय योजणे अत्यंत आवश्यक ठरते. चला तर जाणून घेऊया कोंडा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणारे काही घरगुती उपाय.

डोक्यातील कोंड्याची समस्या केवळ टाळूच्या कोरडेपणामुळेच नाही तर तेलकट टाळू आणि बुरशीजन्य संसर्गामुळेही उद्भवते. कधी कधी पोषणाचा अभाव आणि संप्रेरकांमधील बदल हे देखील कोंडा होण्याचे कारण असू शकते. असे असल्यास कापरापासून बनवलेल्या तेलाच्या वापराने नैसर्गिकरीत्या कोंडा दूर केला जाऊ शकतो.

कसे तयार करायचे?

हे तेल तयार करण्यासाठी कापूर, खोबरेल तेल आणि लिंबू हे साहित्य घ्या. आता एका भांड्यात कापराचे तीन ते चार भाग करून त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या आणि दोन्ही चांगले मिसळा. यानंतर खोबरेल तेल गरम करा. ते थोडेसे थंड झाल्यावर त्यात लिंबू-कापराचे द्रावण घाला म्हणजे कापूर तेल तयार झाले. आठवड्यातून किमान दोनदा रात्री झोपण्यापूर्वी हे तेल केसांना लावा आणि सकाळी सौम्य शाम्पूने धुवा. तुम्हाला कोंड्यापासून त्वरित आराम मिळेल. या तेलाच्या नियमित वापराने केसांमधील संसर्ग दूर होण्यास मदत होते.

कापराच्या 'कुलिंग' गुणधर्मामुळे टाळू थंड राहते आणि त्यामुळे कोंड्यापासून होणारा त्रास कमी होतो. हे तेल केसांच्या फोलिकल्ससाठी देखील फायदेशीर असून केसांच्या वाढीसाठीही मदत करते. दुसरीकडे लिंबाचा रस आम्लयुक्त असल्यामुळे त्याच्या मदतीने बुरशीजन्य संसर्ग दूर होण्यास मदत होते.

logo
marathi.freepressjournal.in