कमी वयातही वाढतोय मोतीबिंदूचा धोका; मधुमेह ठरतोय प्रमुख कारण, वाचा तज्ज्ञांचा इशारा

मोतीबिंदू (Cataract) हा पूर्वी प्रामुख्याने ६० वर्षांनंतर होणारा डोळ्यांचा आजार मानला जात होता. मात्र...
कमी वयातही वाढतोय मोतीबिंदूचा धोका; मधुमेह ठरतोय प्रमुख कारण, वाचा तज्ज्ञांचा इशारा
कमी वयातही वाढतोय मोतीबिंदूचा धोका; मधुमेह ठरतोय प्रमुख कारण, वाचा तज्ज्ञांचा इशारा'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मोतीबिंदू (Cataract) हा पूर्वी प्रामुख्याने ६० वर्षांनंतर होणारा डोळ्यांचा आजार मानला जात होता. मात्र, बदलती जीवनशैली आणि वाढते मधुमेहाचे प्रमाण यामुळे आता ४० ते ५० वयोगटातील तसेच काही प्रकरणांमध्ये त्याहून कमी वयातील व्यक्तींमध्येही मोतीबिंदूचे निदान होत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. रक्तातील साखर दीर्घकाळ नियंत्रणात न राहिल्यास डोळ्यांवर त्याचा गंभीर परिणाम होऊन मोतीबिंदू लवकर होण्याचा धोका वाढतो, असा इशारा बीडीआर फार्मास्युटिकल्स इंटरनॅशनलचे टेक्निकल डायरेक्टर डॉ. अरविंद बडिगेर यांनी दिला आहे.

भारतात मधुमेहाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशन (IDF) च्या अंदाजानुसार, देशात ८९ दशलक्षांहून अधिक नागरिक मधुमेहाने ग्रस्त असून ही संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे मधुमेहाशी संबंधित डोळ्यांच्या आजारांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मधुमेहामुळे मोतिबिंदूचा धोका का वाढतो?

रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ वाढलेले राहिल्यास त्याचा परिणाम डोळ्यातील लेन्सवर होतो. अतिरिक्त ग्लुकोज लेन्समध्ये साचून त्याचे सॉर्बिटॉलमध्ये रूपांतर होते. त्यामुळे लेन्समध्ये सूज येणे, त्यातील प्रथिनांची रचना बिघडणे आणि पारदर्शकता कमी होणे अशा बदलांना सुरुवात होते. परिणामी, मोतीबिंदू अपेक्षेपेक्षा कमी वयात विकसित होण्याचा धोका वाढतो.

कमी वयातही वाढतोय मोतीबिंदूचा धोका; मधुमेह ठरतोय प्रमुख कारण, वाचा तज्ज्ञांचा इशारा
ऑफिसचा ताण ठरतोय मायग्रेनचे कारण? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

याशिवाय मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी आणि काचबिंदू (Glaucoma) यांसारख्या इतर नेत्रविकारांचाही धोका अधिक असतो. त्यामुळे अशा रुग्णांनी डोळ्यांची नियमित तपासणी करणे अत्यावश्यक ठरते.

'ही' लक्षणे दुर्लक्षित करू नका

मोतीबिंदूची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सामान्य दृष्टीदोष समजून दुर्लक्षित केली जातात. खालील लक्षणे दिसल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

  • सतत धूसर दिसणे

  • तेजस्वी प्रकाशाचा त्रास होणे

  • रात्री वाहन चालवताना समोरच्या दिव्यांचा झगमगाट जाणवणे

  • रंग फिकट किंवा पिवळसर दिसणे

  • चष्म्याचा नंबर वारंवार बदलण्याची गरज भासणे

मधुमेह नियंत्रणात ठेवल्यास धोका कमी होऊ शकतो

मोतीबिंदू पूर्णपणे टाळणे नेहमी शक्य नसले तरी मधुमेह योग्य प्रकारे नियंत्रणात ठेवल्यास त्याची प्रगती मंदावू शकते. यासाठी रक्तातील साखरेसह रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे, अँटिऑक्सिडंटयुक्त संतुलित आहार घेणे, अतिनील (UV) किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करणे, धूम्रपान टाळणे आणि दरवर्षी डोळ्यांची 'डायलेटेड आय एक्झामिनेशन' (Dilated Eye Examination) करून घेणे आवश्यक आहे.

कमी वयातही वाढतोय मोतीबिंदूचा धोका; मधुमेह ठरतोय प्रमुख कारण, वाचा तज्ज्ञांचा इशारा
प्रसूतीनंतर सतत चिंता वाटतेय? नैराश्याची असू शकते सुरुवात; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

आधुनिक शस्त्रक्रिया सुरक्षित आणि प्रभावी

मधुमेह असलेल्या अनेक रुग्णांच्या मनात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया सुरक्षित आहे का, असा प्रश्न असतो. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज मोतीबिंदूची शस्त्रक्रिया सुरक्षित, प्रभावी आणि यशस्वी मानली जाते.

तथापि, शस्त्रक्रियेपूर्वी रक्तातील साखर नियंत्रणात असणे, रेटिनाची सविस्तर तपासणी करणे आणि डायबेटिक रेटिनोपॅथीसारख्या इतर नेत्रविकारांवर आवश्यक उपचार करणे गरजेचे असते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर अधिक चांगले परिणाम मिळण्यास मदत होते.

नियमित तपासणीच ठरू शकते दृष्टीरक्षणाची गुरुकिल्ली

भारतात मधुमेहाचे वाढते प्रमाण लक्षात घेता डोळ्यांची नियमित तपासणी ही मधुमेह व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग ठरली आहे. वेळेत निदान, योग्य उपचार आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवल्यास मोतिबिंदूमुळे होणारे दृष्टीचे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in