

महिलांना मासिक पाळी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या भिन्नभिन्न प्रकारच्या असून त्यामागील कारणे उपाय वेगवेगळे असतात. मासिक पाळीत अल्प रक्तस्त्राव किंवा कमी रक्तस्त्राव होणे ही अशीच समस्या आहे. यामध्ये अनेक वेळा महिलांना केवळ १ किंवा २ दिवसच रक्तस्त्राव होण्याची समस्या असते. तर काहींना पूर्ण पाच दिवस रक्तस्त्राव होऊनही तो खूप कमी होतो. परिणामी वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. जाणून घेऊया यामागची कारणे आणि उपाय
अतिविचार आणि ताणतणाव
मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव कमी होण्याच्या कारणांमध्ये अतिविचार आणि त्यामुळे निर्माण होणारा ताणतणाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. यामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोनची वाढ होते. स्वादुपिंड, पिट्यूटरी हायपोथालेमस ग्रंथी यांच्या कार्यावर परिणाम होतो त्यामुळे रक्तस्त्राव कमी होऊ शकतो.
निर्जलीकरण
शरीरात पाण्याची कमतरता अनेक कारणांमुळे होऊ शकते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला जास्त घाम येत असेल किंवा वारंवार लघवीला जावे लागत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. डिहायड्रेशनमुळे रक्ताचे प्रमाण आणि रक्ताभिसरण कमी होते. परिणामी रक्तस्त्रावही कमी होतो.
जीममध्ये प्रमाणापेक्षा जास्त वर्कआऊट
जीममध्ये प्रमाणापेक्षा जास्त वर्कआऊट केल्यामुळे देखील रक्तस्त्राव कमी होऊ शकतो. कारण यामध्ये आवश्यकतेपेक्षा ऊर्जा वापरली जाते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
रजोनिवृत्तीपूर्वी रक्तस्त्राव कमी होतो
महिलेला सजोनिवृत्तीपूर्वीच्या काही काळात देखील रक्तस्त्राव कमी होण्याची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे तुमचे वय जास्त असेल तर याविषयी डॉक्टरांसोबत चर्चा करायला हवी.
वजनातील बदल
सामान्यपणे तुमच्या वजनात बदल होत असेल म्हणजे तुमचे वजन वाढत असेल किंवा वजन कमी होत असेल तरी देखील अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
हार्मोन बदल
मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या हार्मोन बदलांमुळे देखील रक्तप्रवाह कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय गर्भनिरोधकांसारख्या औषधांचा साईड इफेक्ट देखील असू शकतो.
हे आहेत उपाय
मासिक पाळीत कमी रक्तस्त्राव होत असेल तर आपण आहारात काही बदल करून याला पुन्हा सुरळीत करू शकतो.
पपई, अननस आणि आंबा ही फळे खाल्ल्याने मासिक पाळीत रक्तस्त्रावाची पातळी योग्य स्तरावर आणण्यासाठी मदत होते.
शरीरातील निर्जलीकरण हे देखील या समस्येचे कारण असल्याने भरपूर प्रमाणात पाणी पिणे योग्य असते. याशिवाय ज्या फळांमधून पाणी मिळते ती फळे खाणे योग्य असते. यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहू शकते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊ शकतो.
गुळ खाल्ल्याने देखील ही समस्या नियंत्रित येऊ शकते. कारण गुळात लोहोचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हिमोग्लोबिन नियंत्रित होते. त्यामुळे तुमचा मासिक पाळीतील रक्तस्त्राव सुधारू शकतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)