
चैत्र नवरात्री (Chaitra Navratri 2025) रविवार (दि.30) पासून सुरू होत आहे. या नवरात्रीला अनेक जण उपवास करतात. उपवास ठेवल्यानंतर फराळासाठी साबुदाणा खिचडी खाण्याची पद्धत गेल्या शतकापासून सुरू झाली आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का तुम्ही उपवासाला चालते म्हणून जी साबुदाणा खिचडी खाता त्याविषयीच्या काही मजेशीर गोष्टी. चला जाणून घेऊया कोठे आणि कसा तयार होतो साबुदाणा, कोठून आले शेंगदाणे, बटाटे आणि मिरची सुद्धा...
उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी आवडीने खाता. मात्र, तुम्हाला माहित आहे साबुदाणा खिचडीत लागणारे जवळपास सर्व पदार्थ तूप आणि मीठ सोडले तर भारतातील नाही. साबुदाण्यासह बटाटे, शेंगदाणे आणि हिरवी मिरची हे सर्व पीक भारतातील नाही. प्रत्येक पीक गेल्या काही शतकांमध्ये व्यापारामुळे भारतात आले आहेत. विश्वास नाही वाटत तर चला याबाबत अधिक जाणून घेऊया.
साबुदाणा कशापासून तयार होतो?
साबुदाणा हा टॅपिओका या वनस्पतीच्या कंदापासून बनतो. याला कसावा असेही नाव आहे. हे कंद दिसायला रताळू सारखे दिसते. या कंदापासून पांढरा रस तयार केला जातो. तो साठवून त्यावर एक मोठी प्रक्रिया केली जाते. त्यापासून साबुदाणा तयार होतो.
टॅपिओका किंवा कसावा ही वनस्पती मूळ भारतीय नाही. इंग्रजांनी ते भारतात आणले आणि केरळमध्ये १८४० ला त्याचे पहिले उत्पादन घेण्यात आले. केरळच्या त्याकाळच्या त्रावणकोरच्या महाराजांनी १८६० मध्ये भीषण दुष्काळ पडल्यानंतर याच्या शेतीला प्रोत्साहन दिले. अर्थात भारतात साबुदाण्याचा इतिहास हा केवळ १५० वर्ष जुना तरीही आपण हे उपवासाला खातो.
बटाटा
साबुदाणा खिचडीत बटाट्याचा उपयोग केला जातो. बटाटा हे पीक देखील १६ ते १७ व्या शतकाच्या दरम्यान पोर्तुगिजांनी भारतात आणले. तर ब्रिटीशांनी त्यांच्या काळात याची वाढ केली.
शेंगदाणा
शेंगदाणा हे पीक देखील मूळ भारतीय नसल्याचे मानले जाते. या पिकाचे उगमस्थान दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील किंवा पेरू हे आहे, असे काही संशोधने सांगतात. पोर्तुगिजांनी वसाहतवादी काळात सर्वप्रथम हे पीक दक्षिण अमेरिका खंडातून पश्चिम आफ्रिकेत आणले. नंतर तेथून ते पीक नैऋत्य भारतात आणले गेले.
हिरवी मिरची
हिरवी मिरची हे पीक देखील मूळ भारतीय नाही. हे दक्षिण अमेरिका खंडातील मेक्सिकोमधील आहे. क्रिस्टोफर कोलंबसने 15 व्या शतकात अमेरिकेला भेट दिल्यानंतर, त्याने मिरची युरोपमध्ये आणली, जिथून ती जगभरात पसरली. वास्को-द-गामाच्या मार्गे, 16 व्या शतकात मिरची भारतात आली.
साबुदाणा खिचडीतील हे सर्व पदार्थ मूळ भारतीय नाहीत. त्यांचा इतिहास फक्त ४०० वर्ष जुना आहे. मात्र, तरीही हा पदार्थ उपवासासाठी चवीने खातो आहे की नाही मजेशीर!
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)