
चैत्र नवरात्री हा शारदीय नवरात्रीप्रमाणेच देवीचा जागर करण्यासाठीचा नऊ दिवसांचा उत्सव आहे. चैत्र नवरात्रीचा काल रविवार (दि.३०) पासून प्रारंभ झाला आहे. काल देवीच्या शैलपूत्री स्वरुपाची पूजा घराघरांमध्ये तसेच मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात भक्ती भावाने करण्यात आली. आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाईल. तसेच नवरात्रीत देवीच्या नऊ रुपाप्रमाणे नऊ भाग्यशाली रंग आहेत. या रंगाचे कपडे परिधान केल्याने सुख-शांती लाभते, अशी मान्यता आहे. चला जाणून घेऊया नवरात्रीचा आजचा रंग कोणता? काय आहे महत्त्व?
पांढरा अर्थात शुभ्र रंग
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीला पांढरे वस्त्र नेसवतात कारण यादिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी स्वरुपाची पूजा केली जाते. पांढरा रंग हा शांतीचे आणि त्यागाचे प्रतिक आहे. शुभ्र वस्त्र धारण केल्याने मनात विनम्रता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात.
चमकदार पिवळा रंग
देवी ब्रह्मचारिणी ही ज्ञानाची देवता आहे. तिच्या जवळ या सृष्टीतील सर्व विद्या आणि शास्त्रांचे ज्ञान आहे. देवी ब्रह्मचारिणीची आराधना केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते. तसेच जीवनात उत्तुंग शिखर गाठता येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पिवळा रंग हा ज्ञानाशी जोडलेला आहे. तसेच दुर्गा देवीच्या या ब्रह्मचारिणी रुपातील पूजेसाठी पिवळ्या रंगाची फुले वाहतात. तसेच पिवळे फळ अर्पण केले जाते.
त्यामुळे आज पांढरा किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने देवी ब्रह्मचारिणीचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आज पिवळ्या रंगाचे कपडे देखील घालतात.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)