ChatGPT च्या अतिवापरामुळे विचारशक्ती मंदावते? एमआयटीच्या नव्या अभ्यासातून चिंतेचा इशारा

आजच्या पिढीने सतत ChatGPT वापरत राहिल्यास त्यांची कल्पनाशक्ती, अभिव्यक्ती आणि भावनांमधून व्यक्त होण्याची ताकद कमी होऊ शकते, असा धोक्याचा इशारा अमेरिकेतील एमआयटी मीडिया लॅबच्या नव्या अभ्यासातून देण्यात आला आहे.
ChatGPT च्या अतिवापरामुळे विचारशक्ती मंदावते? एमआयटीच्या नव्या अभ्यासातून चिंतेचा इशारा
Published on

आजच्या पिढीने सतत ChatGPT वापरत राहिल्यास त्यांची कल्पनाशक्ती, अभिव्यक्ती आणि भावनांमधून व्यक्त होण्याची ताकद कमी होऊ शकते, असा धोक्याचा इशारा अमेरिकेतील एमआयटी मीडिया लॅबच्या नव्या अभ्यासातून देण्यात आला आहे. विशेषतः तरुण वयात १८ ते ३९ वयोगटातील वापरकर्त्यांमध्ये ही घसरण अधिक जाणवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एमआयटी मीडिया लॅबने ५४ जणांना तीन गटात विभागून निबंध लिहिण्याचे कार्य दिले. यामधील एका गटाने ChatGPT वापरुन तर दुसऱ्या गटाने गुगल सर्च इंजिन, तर तिसऱ्या गटाने कोणतीही बाह्य मदत न घेता स्वत:च्या बुद्धीचातुर्यावर निबंध सादर केला. या निबंधावर संशोधकांनी EEGच्या माध्यमातून मेंदूतील ३२ भागांमधील कार्यक्षमता नोंदवली.

ChatGPT वापरणाऱ्यांमध्ये त्रुटी -

त्यात ChatGPT वापरणाऱ्यांमध्ये मेंदूच्या सक्रियतेत सर्वात कमी गुंतवणूक दिसून आली. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या निबंधांमध्ये सर्जनशीलता (Creativity) नव्हती. काही ठिकाणी माहिती थेट कॉपी-पेस्ट केलेली होती. त्यांनी निबंधांत लिहिलेले मुद्देही त्यांना आठवत नव्हते.

AI वापराने विचारशक्ती मंद?

या अभ्यासानुसार, जेव्हा व्यक्ती AI वर खूप अवलंबून राहतो, तेव्हा मेंदूचे चिंतन, विश्लेषण आणि स्वतंत्र विचार करण्याचा सराव कमी होतो. परिणामी, स्मरणशक्ती आणि आत्मसात करण्याची ताकदही कमजोर होते. अशा वेळी AI फक्त मदत करणारे तंत्रज्ञान न राहता तो व्यक्तीला व्यक्तीला परावलंबी बनवतो.

तसेच, अभ्यासात असेही आढळले, की ज्या गटाने स्वत:च्या अभ्यासाने निबंध सादर केला. तसेच नंतर ChatGPT वापरून काही सुधारणा केल्या; त्यांच्या मेंदूमध्ये कार्यक्षमता आढळून आली. म्हणजेच, जर विचार करण्याचे कौशल्य आपल्याला अवगत असेल तर AI केवळ सहाय्यक आणि उपयुक्त साधन ठरु शकते.

या संशोधनानंतर संशोधकांच्या मते, AI चा वापर करताना विद्यार्थ्यांनी त्याच्या मर्यादा आणि पूर्वग्रह ओळखून विचार करणे गरजेचे आहे. एकूणच AI म्हणजे मदतनीस आहे मेंदूचा पर्याय नव्हे.

logo
marathi.freepressjournal.in