तुमच्या व्यवहारांवर आहे स्कॅमरची नजर; डेबिट-क्रेडिट कार्ड वापरताना बेसावधगिरी येईल अंगलट

डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती कार्डधारकाच्या संमतीशिवाय अनधिकृत व्यवहारांसाठी वापरली जाते तेव्हा कार्डधारकाची फसवणूक होते. गुन्हेगार जसे कुणाचेही प्रत्यक्ष कार्ड चोरू शकतात तसेच तपशील स्किम करू शकतात किंवा फिशिंग स्कॅमद्वारे संवेदनशील माहिती शेअर करण्यासाठी तुम्हाला फसवून मोठ्या आर्थिक संकटात टाकू शकतात.
तुमच्या व्यवहारांवर आहे स्कॅमरची नजर; डेबिट-क्रेडिट कार्ड वापरताना बेसावधगिरी येईल अंगलट
Published on

मुंबई : डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती कार्डधारकाच्या संमतीशिवाय अनधिकृत व्यवहारांसाठी वापरली जाते तेव्हा कार्डधारकाची फसवणूक होते. गुन्हेगार जसे कुणाचेही प्रत्यक्ष कार्ड चोरू शकतात तसेच तपशील स्किम करू शकतात किंवा फिशिंग स्कॅमद्वारे संवेदनशील माहिती शेअर करण्यासाठी तुम्हाला फसवून मोठ्या आर्थिक संकटात टाकू शकतात.

दक्षिण मुंबईतील एका महिलेच्या क्रेडिट कार्डचा तपशील वापरत परस्पर कोपरखैरणे येथील एका पेट्रोल पंपावर ४० हजार रुपये जमा करण्यात आले, तर बँकेतून बोलत असल्याचे सांगत डेबिट कार्ड बंद होण्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाला पावणेदोन लाखांना गंडा घालण्यात आला. डिजिटल व्यवहार वाढत असताना दुसरीकडे सायबर गुन्हेगारही एकाहून एक क्लुप्त्या वापरत असल्याने त्यांना हुडकणे कठीण होत आहे. गुन्हेगार बँक कर्मचारी असल्याचे भासवत फसवे ईमेल अथवा मेसेज पाठवतात. त्यात अनेकदा बनावट वेबसाइटच्या लिंक असतात. त्या लिंकवर कार्डधारकांनी आपल्या कार्डचा तपशील भरल्यास सगळा डेटा चोरीला जातो. प्रत्यक्ष व्यवहारदरम्यान कार्डची चुंबकीय पट्टी माहिती मिळवण्यासाठी स्कीमिंग डिव्हाईस अथवा कार्ड टर्मिनलशी जोडलेली असते. चोरलेला डेटा नंतर ड्युप्लिकेट कार्ड तयार करण्यासाठी वापरला जातो. या घोटाळ्यात किरकोळ ऑनलाइन व्यवहारांमधून कार्डचा क्रमांक चोरत नंतर मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. काहीवेळा तर स्कॅमर थेट कार्डधारकाच्या ऑनलाइन बँकिंग अथवा क्रेडिट कार्ड खात्यात प्रवेश मिळवून लॉगइन तपशील बदलतात आणि अनधिकृत व्यवहार करतात.

काही बनावट वेबसाइट तर हुबेहुब अधिकृत शॉपिंग प्लॅटफॉर्मसारख्या दिसतात. ग्राहक जेव्हा चेकआऊटच्या वेळी आपल्या कार्डची माहिती देतात तेव्हा क्षणार्धात डेटा चोरीला जातो. आपले कार्ड कधीही चोरीला जाऊ शकेल अशा ठिकाणी ठेवू नका. त्यासोबत पिन तर अजिबात लिहून ठेवू नये. जुने स्टेटमेंट आणि आर्थिक तपशील असलेली कागदपत्रे विल्हेवाट लावण्यापूर्वी फाडून टाका.

काय कराल?

  • वापरत नसलेली फीचर निष्क्रिय करा : गरज नसताना ऑनलाइन, आंतरराष्ट्रीय व्यवहार बंद करा.

  • रक्कम नीट तपासा : तुमचा पिन एंटर करण्यापूर्वी स्क्रीनवरील रक्कम तपासून पहा आणि स्कीमिंग डिव्हाइससाठी पॉस मशीन तपासा.

  • तुमचे कार्ड नजरेसमोर ठेवा : व्यवहारादरम्यान कार्ड इतरांना हाताळायला दिल्यास त्यावर नजर ठेवा.

  • पिन संरक्षित करा : एटीएम किंवा पीओएस मशीनमध्ये तुमचा पिन एंटर करताना कीपॅड झाकून ठेवा.

काय टाळाल?

  • तपशील शेअर करू नका : कार्डचा क्रमांक, सीव्हीसी किंवा पिन कधीही कोणासोबत शेअर करू नका.

  • पिन साठवू नका : तुमचा पिन कुठेही लिहून ठेवू नका किंवा सेव्ह करू नका.

  • सार्वजनिक वाय-फाय टाळा : असुरक्षित नेटवर्कवर तुमचे कार्ड वापरू नका.

  • सूचनांकडे दुर्लक्ष करू नका : संशयास्पद व्यवहारांची तक्रार तुमच्या बँकेला तत्काळ करा.

logo
marathi.freepressjournal.in