
मुंबई : उत्तर प्रदेशातील एका महिला खासदाराचा हरयाणातील दोन अल्पवयीन मुलांनी डीपफेक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेला अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात हे कृत्य केल्याची कबुली त्या मुलांनी दिली आहे. दीड वर्षांपूर्वी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्याने उठलेले वादळही अजून लोकांच्या स्मरणात आहे. या घातक तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखणे हे सध्या मोठे आव्हान झाले आहे. सायबर गुन्हेगार या प्रगत कृत्रिम तंत्रज्ञानाचा गैरवापर करून बनावट व्हिडीओ किंवा ऑडिओ क्लिप तयार करतात. त्यासाठी खऱ्या फुटेज किंवा रेकॉर्डिंग्जमध्ये फेरफार करतात आणि या बनावट क्लीप नंतर सोशल मीडिया, मेसेजिंग अॅप्स आणि ईमेलद्वारे पसरवल्या जातात. सायबर गुन्हेगार बहुतेकदा मान्यवर व्यक्ती, सेलिब्रिटी किंवा अधिकार पदावरील लोकांना लक्ष्य करतात. दर्शकांना फसवणे किंवा खोटी माहिती पसरवणे हे त्यामागचे उद्दिष्ट असते. डीपफेक खरा वाटावा यासाठी सायबर गुन्हेगार हे सोशल इंजिनिअरिंग तंत्रांचा वापर करून व्यक्ती आणि संस्थांना धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे अशा क्लिप इतक्या हुबेहूब असतात की त्यातून गैरसमज निर्माण होऊन अनुचित घटनाही घडू शकतात. गेल्यावर्षी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा एक ऑडिओ डीपफेक व्हायरल झाला होता. त्यात ते राष्ट्रीय सुरक्षेबाबत वादग्रस्त विधाने करताना दिसत होते. परदेशात अनेक ठिकाणी वित्त संस्थांमधील अधिकाऱ्यांना गुन्हेगारांनी त्यांच्या सहकाऱ्यांचे डीपफेक व्हिडिओ पाठवून मोठमोठ्या रकमा त्यांच्या खात्यात ट्रान्स्फर करण्यास भाग पाडल्याच्या घटना घडल्या आहेत.
काय कराल?
माहिती ठेवा : डीपफेक तंत्रज्ञान आणि त्याच्या धोक्यांबद्दल जाणून घ्या.
क्लिपची खातरजमा करा: शेअर करण्यापूर्वी किंवा त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी माध्यमांची प्रामाणिकता तपासा.
विश्वसनीय स्रोतांचा वापर करा : बातम्या आणि अपडेट्ससाठी प्रतिष्ठित प्लॅटफॉर्मवर अवलंबून रहा.
संशयास्पद सामग्रीची तक्रार करा : संभाव्य डीपफेक आढळल्यास अधिकाऱ्यांना किंवा प्लॅटफॉर्मना सूचना द्या.
काय टाळाल?
खोटी माध्यमे शेअर करू नका : त्याची सत्यता तपासल्याशिवाय प्रसार करणे टाळा.
संशयास्पद स्रोतांवर विश्वास ठेवू नका : डीपफेक शेअर करू शकणाऱ्या अविश्वसनीय स्रोतांपासून दूर रहा.
आंधळेपणाने विश्वास ठेवू नका : अतिरंजित किंवा भावनिक कंटेंटपासून सावध रहा.
गोपनीयतेकडे दुर्लक्ष करू नका: गोपनीयता सेटिंग्ज तपासा आणि तुम्ही ऑनलाइन शेअर करत असलेली वैयक्तिक माहिती मर्यादित ठेवा.