
आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपल्या शरिरात रक्तदाब योग्य असायला हवे. मात्र, अनेक वेळा अस्वस्थकर जीवनशैली, अयोग्य आहार आणि अन्य अनेक कारणांमुळे रक्तदाब वाढतो किंवा कमी होतो. रक्तदाब वाढणे किंवा कमी दोन्हीही आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे शरिरात रक्तदाब सामान्य पातळीत असायला हवा. जाणून घ्या रक्तदाब म्हणजे काय? रक्तदाब कमी होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय...
रक्तदाब म्हणजे काय?
आपले हृदय शरिरात रक्त पंप करत असते. या प्रक्रियेत रक्ताचा दाब हा रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर पडत असतो. यालाच रक्तदाब, असे म्हणतात. जेव्हा हा दाब सामान्य पातळीपेक्षा जास्त असतो. तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हणतात. तर जेव्हा रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा कमी होतो तेव्हा त्याला कमी रक्तदाब, असे म्हणतात. रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा जास्त होणे किंवा कमी होणे या दोघांसाठी वेगवेगळी कारणे आहेत. आपण इथे कमी रक्तदाब होण्याची कारणे आणि त्यावरील काही सोपे उपाय पाहूया...
रक्तदाब कमी होण्याची कारणे
रक्तदाब कमी होण्याची अनेक वेगवेगळी कारणे असतात. मात्र सामान्यपणे शरिरात पाण्याची पातळी कमी होणे, सातत्याने कोणती ना कोणती औषधे सुरू असणे विशेषकरून उच्च रक्तदाबाची औषधे दीर्घकाळापर्यंत घेणे, हृदयविकाराच झटका, गंभीर स्वरुपातील जंतूसंसर्ग इत्यादी रक्तदाब कमी होण्याची सामान्य कारणे आहेत.
कमी रक्तदाबावर उपचार
उच्च रक्तदाबाप्रमाणेच कमी रक्तदाब होणे ही देखील एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे निष्काळजीपणा न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधे घ्यावी. नियमित औषधांच्या सेवनाने कमी रक्तदाब सामान्यपातळीवर येतो.
औषधांसह आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
30-32 बेदाणे खाणे
कमी रक्तदाबाच्या समस्येसाठी साधारणपणे 30-32 बेदाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यावर हे बेदाणे चावून चावून खा. तसेच बेदाणे भिजवलेले पाणी देखील उपयक्त असते. ते पाणी प्यायलाही हरकत नाही.
तुळशीची पाने
तुळस ही बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तसेच तिला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असल्याने प्रत्येकाच्या घरात तुळस असते. तुळशीच्या 10 ते 15 पानांचे तुकडे करून एका कपड्यात बांधून ठेवा. सकाळी उठल्यावर ही पानं एक चमचा मधात घालून हे मिश्रण खा. यामुळे निश्चितच फायदा होतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)