नवी दिल्ली : झटपट, चमचमीत, प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ खाण्याचे प्रमाण समाजात वाढले आहे. पॅकबंद मिळणाऱ्या पदार्थांमुळे आपल्या जीवावर किती बेतत आहे, याचा अहवाल नुकताच ‘आयसीएमआर’ने जाहीर केला आहे. देशातील ५६ टक्के आजारांचे मूळ हे प्रक्रियायुक्त, अति प्रथिने, मीठ व तेलाचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांमध्ये आहे, असे ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे.
गेल्या दोन दशकात भारतात उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, मधुमेह, कर्करोगाचा धोका वाढत आहे. देशातील वाढत्या आजारांबाबत भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएमआर) चिंता व्यक्त केली.
देशातील ५६ टक्के आजार हे अयोग्य आहारामुळे होत असून, चुकीचा आहार घेतल्याने अल्पकालीन व दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. निकृष्ट आहारामुळे आरोग्याला निर्माण होणारी जोखीम कमी करायला ‘आयसीएमआर’च्या शास्त्रज्ञांनी १७ मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. देशात लठ्ठपणा व मधुमेह वाढत आहे. यावर मात करायला आहारात सुधारणा करणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय पोषण संस्थेने सांगितले की, सकस आहार व व्यायामामुळे ह्रदयाशी संबंधित आजार व उच्च रक्तदाबाचा धोका कमी होऊ शकतो. पौष्टिक आहार घेतल्यास मधुमेहाच्या ‘टाईप-२’चा धोका ८० टक्के कमी होऊ शकतो. आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारल्यास अवेळी मृत्यूचा धोका कमी होतो. मर्यादित मीठ, तेल, चरबीयुक्त अन्नपदार्थ कमी खाणे, व्यायाम करणे, साखर व प्रक्रियायुक्त अन्नाचा त्याग करणे गरजेचे आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात. त्यामुळे वजन कमी करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. त्यातून आरोग्याच्या समस्या कमी केल्या जाऊ शकतात, असे संस्थेने नमूद केले.
भारतीयांचा आहार बदलला
‘आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. राजीव बहल म्हणाले की, गेल्या काही दशकात भारतीयांच्या आहारात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे देशात आजारपण वाढत आहेत. यामुळे आहारात बदल होणे गरजेचे आहे. आहारात ४५ टक्क्यांपेक्षा अधिक कॅलरीचे प्रमाण असू नये. दूध, सुकामेवा, फळ आदींचे प्रमाण अधिक असावे.
प्रथिनांचा मारा नको
देशात प्रथिनांची औषधे घेतली जात आहेत. प्रथिनांच्या पावडरमुळे दीर्घकालीन आजार होऊ शकतात. बाजारात हवाबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यात सोडियम, साखरेचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे. प्रक्रियायुक्त व अति प्रक्रियायुक्त पदार्थांमुळे अनेक गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यापासून दूर राहणे गरजेचे आहे, असा इशारा त्यांनी दिला.