
रवींद्र राऊळ/मुंबई
सरकारी अधिकाऱ्यांकडून कारवाई म्हटली की निरपराध नागरिकही गांगरून जात असल्याचा गैरफायदा घेत ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ऑनलाइन खंडणी उकळण्याचे प्रकार सध्या सर्रास सुरू आहेत. अलीकडेच नवी मुंबईतील प्राध्यापक महिलेला आयकर अधिकारी असल्याचे सांगत ‘स्कॅमर’ टोळीने ‘डिजिटल’ अटकेची भीती दाखवत तब्बल एक कोटी ८१ लाख रुपये त्यांच्या वेगवेगळ्या सहा खात्यांमध्ये ट्रान्स्फर करावयास लावले. अशा गुन्ह्यातील हडपलेल्या रकमा कोट्यवधींच्या घरात आहेत.
‘डिजिटल’ अटक म्हणजे एखाद्याला पारंपरिकरीत्या शारीरिक अटक करण्याऐवजी डिजिटल माध्यमांद्वारे (जसे की व्हिडीओ कॉल) ताब्यात घेतले जाते किंवा घरातच नजरकैद केले जाते. अनेकदा ‘स्कॅमर’ हे आपण पोलीस, आयकर, ईडी, कस्टम अथवा तत्सम सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करतात. तुमच्या आधार कार्डाचा वापर करून ‘मनी लाँड्रिंग’ करण्यात आले आहे. तुमच्या नावाने ड्रगचे पार्सल पाठवण्यात आले आहे अथवा तस्करीच्या गैरव्यवहारात अडकल्याचे तपासात आढळले आहे, असे दरडावून सांगत ‘व्हिडीओ कॉल’वर घरातच नजरकैद करण्याचे आणि चौकशीचे नाटक करत वैयक्तिक माहिती मिळवून बँक खाते साफ केले जाते.
हे सायबर गुन्हेगार इतके सराईत असतात की, या तोतया सरकारी अधिकाऱ्यांची संभाषणाची पद्धत, गणवेश आणि त्यांचे बनावट कार्यालय पाहून अनेक जणांचा ते खरोखरच सरकारी अधिकारी असल्याचा समज होतो आणि ते फशी पडतात. आपण खरेच सरकारी अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी ते ‘व्हिडीओ कॉल’वर आपले ओळखपत्र आणि अटक वॉरंटही दाखवतात जे बनावट असतात. त्यामुळे अटकेची कारवाई टाळण्यासाठी घाबरलेले लोक आपल्या बँक खात्याचा तपशील, आधारकार्ड, पॅन कार्डची माहिती या गुन्हेगारांना देतात. त्याआधारे गुन्हेगार काही वेळातच सारी रक्कम आपल्या खात्यात वळती करून घेतात. दुर्दैवाने वयस्कर मंडळी मोठ्या प्रमाणावर या प्रकारांना बळी पडतात.
काय कराल?
तथ्य जाणून घ्या : पोलीस किंवा सरकारी अधिकारी कधीही ‘व्हिडीओ कॉल’द्वारे चौकशी करत नाहीत. भारतात सरकारी अधिकारी कार्यालयात समक्ष चौकशी केली जाते.
वैयक्तिक माहिती शेअर करू नका : कोणताही सरकारी अधिकारी ‘व्हिडीओ कॉल’द्वारे पैसे किंवा वैयक्तिक माहिती मागणार नाही.
शांत रहा : जर तुम्हाला असे कॉल आले तर cybercrime.gov.in च्या 'रिपोर्ट सस्पेक्ट टॅब'वर त्वरित त्यांची तक्रार करा. स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून त्यांना साऱ्या प्रकाराची कल्पना द्या.
कायदा समजून घ्या : भारतात 'डिजिटल अटक' ही प्रक्रिया अस्तित्वात नाही.
काय टाळाल?
घाबरू नका : शांत रहा आणि ‘डिजिटल’ अटकेच्या घोटाळ्यांना बळी पडू नका.
स्कॅमर्सना प्रतिसाद देऊ नका : जर कोणी ‘व्हिडीओ कॉल’द्वारे तुमच्यावर दबाव आणला तर पैसे पाठवू नका आणि वैयक्तिक माहिती देऊ नका.
जास्त काळ गुंतू नका : संशयास्पद वाटणाऱ्या लांब ‘व्हिडीओ कॉल’मध्ये अडकणे टाळा.
पडताळणी न केलेल्या कॉलवर विश्वास ठेवू नका : सरकारी अधिकारी असल्याचे सांगून पैसे मागणाऱ्या कोणत्याही ‘व्हिडीओ कॉल’कडे दुर्लक्ष करा.