

केसांचे सौंदर्य जपण्यासाठी केसांची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. यामध्ये केसांना पोषण देणारे खाद्य पदार्थांचा आहारात समावेश करण्यापासून ते केस धुताना योग्य पद्धतीने केस धुणे इत्यादींचा समावेश आहे. अनेक जण धावपळीमुळे किंवा माहित नसल्याने केस धुण्याच्या चुकीच्या पद्धतींचा अवलंब करतात. याचा परिणाम केसांवर होतो. परिणामी केस तुटतात, गळतात आणि पातळ होतात. हे टाळण्यासाठी केस धुताना कोणत्या चुका टाळाव्या हे माहित असणे आवश्यक आहे. जाणून घ्या केस धुण्याची योग्य पद्धत...
कडक किंवा अतिगरम पाण्याने केस धुवू नये
अनेकांना थंड किंवा कोमट पाणी सहन होत नाही. परिणामी ते आंघोळीसाठी कडक किंवा अतिगरम पाण्याचा उपयोग करतात. मात्र, केस धुण्यासाठी अतिगरम पाणी वापरणे हे खूप घातक आहे. यामुळे केसांच्या मुळांना इजा पोहोचते. ते कमकुवत होतात. त्यामुळे केस तुटण्याचे आणि गळण्याचे प्रमाण वाढते.
केसांवर डायरेक्ट शाम्पू लावणे
हल्ली सगळेच जण शाम्पूने केस धुतात. मात्र, शाम्पूने केस धुण्याची योग्य पद्धत अनेकांना माहित नाही. शाम्पू हा थेट केसांमध्ये कधीच लावयचा नसतो. यामुळे शाम्पूतील हानिकारक रासायनिक घटकांचा केसांवर थेट परिणाम होऊ शकतो. एक मगभर पाण्यात आधी शाम्पूचा छान फेस करून घ्या. आता या पाण्याने केस धुवावे. यामुळे शाम्पूतील हानिकारक रासायनिक घटक माईल्ड होतात.
केस धुतल्यानंतर लगेचच कोरडे करणे
ओले केस हे नाजूक असतात. त्यामुळे ते लगेच टॉवेलने कोरडे करू नये. तर केसांना किमान २० मिनिटे टॉवेल बांधून ठेवावा. नंतर टॉवेल सोडून काही वेळ नैसर्गिकरित्या केस वाळू द्यावे. त्यानंतर हळूहळू टॉवेलने केस कोरडे करावे. यामुळे केस तुटण्याचे प्रमाण कमी होते.
ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवू नये
ओले केस लगेच कोरडे करू नये त्याच प्रमाणे ओल्या केसांमध्ये लगेच कंगवा देखील फिरवू नये. कारण नाजूकपणामुळे केस तुटून कंगव्यात येऊ शकतात. तसेच केसांच्या मुळांना इजा होऊ शकते. ते कमकुवत होऊ शकतात.