
अनेकवेळा आजारपणातून उठल्यानंतर सातत्याने औषधे खाण्यामुळे तोंडाची चव जाते. तोंडाची चव जाणे ही एक समस्याच आहे. औषधाने कडवट पडल्यामुळे अनेक वेळा तोंडाची चव जाण्याची शक्यता असते. अशा वेळी माणसाला नेहमीचे जेवण करावेसे वाटत नाही. परिणामी पुन्हा अशक्तपणा येण्याची शक्यता असते. तसेच कोणतेही चमचमीत पदार्थ खाऊ अशा वेळी खाऊ शकत नाही आणि रोजचे जेवण चपाती, भाजी, वरण-भात हे खाण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी तुम्ही चकोल्या किंवा वरणफळ करून खाल्ल्यास आहारातील बदलामुळे तोंडाची चव पुन्हा येऊ शकते.
चकोल्या किंवा वरणफळ हा तसा तर नेहमीच्याच जेवणातील पदार्थ मात्र तो दररोज केला जात नाही. यामध्ये आलं, लसून, कोथिंबिर, खोबरं असल्याने हा रूचकर आणि जीभेला चव आणणारा बनतो. हा पदार्थ बनवण्यास अगदीच सोपा आहे. याला फार जास्त साहित्य लागत नाही. तसेच हा पदार्थ तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. तसेच गव्हाचे पीठ, डाळ वापरून कमी तेलात तयार होणारा हा पदार्थ पौष्टिक देखील असतो.
वरणफळ साहित्य आणि कृती
वरणफळ किंवा चकोल्या बनवण्यासाठी तुरीची डाळ (तुम्ही मुगाची डाळ किंवा सर्व मिक्स डाळी देखील वापरू शकता) आलं, लसून, कोथिंबिर, किसलेलं खोबरं, गव्हाचे पीठ चवीला मिठ इतक्या कमी साहित्यात तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवा तो मसाला आणि चटणी वापरू शकता.
कृती
डाळ पहिले चांगली शिजवून घ्या. शिजवलेली डाळ चांगली घोटून घ्या. त्यानंतर कमी तेलात तुमच्या आवडीचे मसाले टाकून फोडणी द्या. आलं, लसून मात्र निश्चित टाका त्यामुळे पदार्थ रुचकर लागतो. कोथिंबीर बारीक चिरून घ्या. किसलेलं खोबरं तयार ठेवा. फोडणी देऊन त्यात तुम्हाला हवे ते मसाले टाका. आता पाणी टाकून हे मिश्रण उकळू द्या. तोपर्यंत पीठ मळून त्याच्या चपात्या लाटून घ्या. आता डाळ उकळत असताना त्यामध्ये या लाटलेल्या चपात्या सुरीने कापून त्याचे तुकडे डाळीच्या मिश्रणात टाकत चला. आणि थोडे घट्ट आणि थोडे पातळ राही पर्यंत शिजू द्या.
प्लेटमध्ये काढल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबिर आणि खोबरे टाका आणि थोडे कोमट असतानाच खा. नेहमीच्या जेवणापेक्षा असा वेगळा पदार्थ आहारात समाविष्ट केल्यामुळे तोंडाची चव बदलण्यास मदत होते आणि जेवण करण्याची देखील इच्छा होते.