

अलिकडे गर्भसंस्कार वर्ग घेणे, गर्भसंस्कार करणे याला पुन्हा एकदा फार महत्त्व येत आहे. याबाबतीत अनेक वेगवगळे समज आहे. गर्भसंस्कारामुळे होणारे बालक तेजस्वी, बुद्धिमान होते अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मात्र, यापैकी किती गोष्टी खऱ्या आणि किती गोष्टी खोट्या आहेत. आधुनिक काळात गर्भसंस्कार करणे किती महत्त्वाचे जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
प्राचीन भारतात १६ संस्कार पद्धत होती. यामध्ये गर्भसंस्कार नावाचा एक भाग होता. गर्भसंस्काराचे वेगवेगळे टप्पे आहेत. यामध्ये गर्भाधानपासून प्रसुतीकाळापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. अनेक जाणकारांच्या मतानुसार आईच्या गर्भात वाढणारे बाळ हे येणाऱ्या अनेक पिढ्यांमधील अनुवांशिक संरचनेवर परिणाम करत असते. तसेच त्यात बदल करत असते. त्यामुळे गर्भधारणेपासून ते प्रसुतीपर्यंतच्या काळापर्यंत आईला खूप काळजी घ्यावी लागते. आयुर्वेदात गर्भसंस्काराच्या माध्यमातून याविषयी काळजी घेण्यास सुचवले आहे. संस्कार या शब्दाची व्याख्या परिवर्तन किंवा चांगला बदल करणे होय, असे मानले जाते.
गर्भाधान म्हणजे काय?
या प्रक्रियेत गर्भधारणेपूर्वीचे आई वडिलांचे आरोग्य, बीज शुद्धता, आहार-विहार त्यांची मानसिक स्थिती याचा विचार केला जातो. त्यामुळे आयुर्वेदानुसार गर्भधारणेपूर्वी मिलनाच्यावेळी स्त्री-पुरुष दोघांचे शरीर आणि मन सक्षम आणि आनंदी असावे, असे सांगण्यात आले आहे. यामुळे बाळ सुदृढ आणि निरोगी जन्माला येते. मात्र, यामध्ये बाळ बुद्धिमान होते का याविषयी फारसे सांगण्यात आलेले नाही.
गर्भवती महिलेचा आहार
सुदृढ आणि निरोगी संततीसाठी गर्भवती महिला म्हणजेच मातेच्या आहाराविषयी तसेच तिच्या दिनचर्येविषयी गर्भसंस्कारात अनेक महत्त्वाच्या गोष्टी अंतर्भूत केल्या आहेत. मातेचा आहार कसा असावा, तिची मानसिक स्थिती, व्यायाम, योगासन प्राणायाम इत्यादी गोष्टी
गर्भसंस्कारामुळे बुद्धिमान बाळ जन्माला येते का?
अशी मान्यता आहे की आईच्या पोटात बाळ आई जे काही सांगते, बोलते ते ऐकत असतो. त्यामुळे आईने बाळासोबत कायम उत्तम संवाद साधावा, असे सांगण्यात आले आहे. यालाच गर्भसंवाद म्हटले जाते. परिणामी आईने मुलाला गर्भात असतानाच उत्तम आणि बौद्धिक गोष्टीचे ज्ञान दिले तर जन्माला आलेले बाळ हे बुद्धिमान असू शकते, असे मानले जाते. मात्र, याला अद्याप पर्यंत कोणत्याही टेस्टद्वारे सिद्ध करण्यात आलेले नाही. तसेच सखोल अभ्यासाद्वारे याला सिद्ध करण्यात आलेले नाही.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)