
मीठ हा आपल्या आहारातील प्रमुख घटक आहे. आहारातील कोणताही पदार्थ मीठाशिवाय होत नाही. मीठ हे अनेक आजारांमध्ये देखील उपयुक्त ठरते. तुम्हाला साधे मीठ, खडे मीठ, किंवा सैंधव मीठ माहित असेलच. प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येकाचे उपयोगही वेगवेगळे असतात. मग तुम्ही Epsom Salt (एप्सम मीठ) बद्दल ऐकले आहे का? काय आहे हे एप्सम मीठ ज्याला मॅग्नेशियम सल्फेट देखील म्हणतात. याचे उपयोग माहित आहेत का? चला जाणून घेऊ या काय आहे एप्सम मीठ?
एप्सम मीठ
एप्सम मीठ याला मॅग्नेशियम सल्फेट देखील म्हणतात. हे पांढऱ्या क्रिस्टल सारखे दिसते. ते मॅग्नेशियम, सल्फेट आणि ऑक्सिजन यांनी मिळून बनलेले असते. सामान्यपणे खनिज युक्त पाण्यातून प्रक्रिया करून हे मॅग्नेशियम सल्फेट बनवले जाते. याच्या गुणधर्मांमुळे हे अनेक प्रकारे उपयोगात आणले जाते. हल्ली सौंदर्य प्रसाधनांमध्ये देखील याचा उपयोग होत आहे.
एप्सम मीठाचे उपयोग
एप्सम मीठ हे पाठदुखी, अंगदुखीत आराम देणारा एक उत्तम पर्याय आहे. याशिवाय थकवा घालवायचा असेल तरी देखील याचा उपयोग होतो. पाठदुखीच नाही तर अंगावरील सूज कमी होण्यासही हे मदत करते. लक्षात घ्या एप्सम मीठ हे सैंधव मीठ नाही. सैंधव मीठ आणि एप्सम मीठ या दोन्हींच्या मूलभूत रासायनिक रचनेत मोठा फरक आहे. एप्सम मीठ ज्याला मॅग्नेशियम सल्फेट असेही म्हटले जाते.
हे प्रामुख्याने आंघोळीच्या पाण्यात घालून ते पाणी पाठीवर घेऊन त्याने पाठ शेकून काढल्यास त्याचा फायदा होतो. पायाला सूज येणे किंवा गुडघेदुखी यामध्ये देखील एप्सम मीठ फायदेशीर ठरते. अनेकवेळा सातत्याने होणाऱ्या धावपळीमुळे पाय दूखतात, अशा वेळी साध्या मीठा ऐवजी एप्सम मीठ गरम पाण्यात घालून त्याचा शेक घेतल्यास अधिक फायदा होतो. याशिवाय जीममधून व्यायाम करून आल्यानंतर तुम्ही हे मीठ पाण्यात घालून आंघोळीसाठी याचा उपयोग केल्यास त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होतो.
त्वचेच्या आजारांमध्येही आहे उपयुक्त
एप्सम मीठाच्या पाण्याने आंघोळ करणे हे फक्त अंगदुखीसाठीच नाही तर त्वचेला देखील आरामदायक असते. त्वचेला खाज येणे किंवा अन्य गोष्टींमध्ये याचा लाभ येतो. परिणामी हल्ली बॉडी वॉश, फूट क्रीम या सारख्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये देखील याचा उपयोग होतो.