सोशल मीडियाच्या जगात तोतयांचा धुमाकूळ; बनावट अकाऊंट होल्डरकडून होणाऱ्या छळात वाढ

जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडणारे व्यासपीठ म्हणून सोशल मीडिया प्रस्थापित झालेला असताना येथे तोतयांचाही प्रचंड धुमाकूळ सुरू आहे. कोणीतरी खऱ्या व्यक्तीची किंवा संस्थेच्या अकाऊंटची नक्कल करून त्याचा वापर करत इतरांना फसवत आर्थिक घोटाळे, अब्रनुकसानीचे प्रकार आणि खोटी माहिती पसरवण्याची कृत्ये करतो तेव्हा अनेकांना मनस्ताप भोगावा लागतो.
सोशल मीडियाच्या जगात तोतयांचा धुमाकूळ; बनावट अकाऊंट होल्डरकडून होणाऱ्या छळात वाढ
Published on

मुंबई : जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडणारे व्यासपीठ म्हणून सोशल मीडिया प्रस्थापित झालेला असताना येथे तोतयांचाही प्रचंड धुमाकूळ सुरू आहे. कोणीतरी खऱ्या व्यक्तीची किंवा संस्थेच्या अकाऊंटची नक्कल करून त्याचा वापर करत इतरांना फसवत आर्थिक घोटाळे, अब्रनुकसानीचे प्रकार आणि खोटी माहिती पसरवण्याची कृत्ये करतो तेव्हा अनेकांना मनस्ताप भोगावा लागतो. अशा बनावट अकाऊंटच्या कारवायांपासून स्वत:ला वाचवणे हे सध्या एक आव्हान झाले आहे.

कधीतरी तुम्हाला फेसबुकवर मित्राची फ्रेंड रिक्वेस्ट येते. प्रोफाईल आणि फोटोही मित्रचाच असल्याने तुम्ही ती अक्सेप्ट करता. काही दिवसांनी त्याचा मेसेंजरवर मेसेज येतो, अडचणीत असल्याचे सांगत तो तुमच्याकडे पैशांची मागणी करतो. प्रोफाईल मित्राचे असल्याचे तुम्हाला काही शंका येत नाही आणि तुम्ही ती रक्कम त्याने सांगितलेल्या खात्यात जमा करता. काही काळाने तुम्हाला समजते ते प्रोफाईल त्या मित्राचे नव्हतेच. कुणा तोतयाने तुम्हाला गंडा घातलाय. काहीवेळा तुमचेच बनावट प्रोफाईल तयार करून कोणीतरी तुमच्या मित्रांकडे पैसे मागतो. बरेचदा सेलिब्रिटींच्या प्रोफाईलसोबत घडते आणि अनेकजण त्याला बळी पडतात.

नवे बनावट प्रोफाईल तयार करणारे तुमचे इन्स्टाग्राम किंवा फेसबुक अकाऊंटसुद्धा हॅक करून तुमच्या फॉलोअर्सकडून पैसे मागतात. तेव्हाही मित्राचे, नातेवाईकाचे नेहमीचेच प्रोफाईल असल्याने अनेकजण तात्काळ मदत करतात. प्रोफाईलच हॅक झाल्याने तुमचा त्या खात्यावरचा प्रवेशही नाहीस होतो.

जीवनसाथी मिळवण्यासाठी विवाह ठरवणाऱ्या वेबसाइटवर नकली प्रोफाईल तयार करून तरुण - तरुणींना उध्वस्त करण्याचे प्रकार तर सातत्याने घडत आहेत. मैत्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सोशल मीडियावर तर भयावह परिस्थिती आहे. जे प्रोफाईल दिसते त्यावरील माहिती आणि फोटोशी प्रत्यक्षातील अकाउंटहोल्डरशी काडीचाही संबंध नसतो. आपण कुणाशी बोलतोय, प्रत्यक्षात तो पुरुष आहे की महिला हेही समजत नाही आणि त्यातून शारीरिक आणि मानसिक छळाच्या घटना वाढत आहेत.

बरेचदा समाजकंटक भलत्याच व्यक्तीच्या नावे बनावट प्रोफाईल तयार करून वैमनस्य असलेल्या व्यक्तीचे मॉर्फ केलेले फोटो, बदनामीकारक मजकूर, अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर आपलोड करतात. तोतयेगिरीचे ते तोटे नको असतील तर संशयास्पद व्यक्तींच्या रिक्वेस्ट कटाक्षाने टाळा.

काय कराल?

  • प्रोफाईलची पडताळणी करा : अकाऊंटचा खरेपणा तपासण्यासाठी सुसंगत वापरकर्तानावे आणि परिचित प्रोफाइल फोटो शोधा.

  • सावधगिरी बाळगा : अनावश्यक संदेश टाळा आणि कधीही वैयक्तिक तपशील शेअर करू नका किंवा संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका.

  • तोतयागिरीची तक्रार करा : प्लॅटफॉर्म आणि तोतयांची माहिती खऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला कळवा.

काय टाळाल?

  • पैशांच्या मागणीची खातरजमा करा : फोन कॉल किंवा प्रत्यक्ष भेटीद्वारे मित्र किंवा नातेवाईकांकडून रकमेची मागणी पडताळून पाहा.

  • पेमेंट करू नका : अज्ञात व्यक्तींना आणि धर्मादाय संस्थांना पैसे देणे टाळा.

  • माहिती खासगी ठेवा : सोशल मीडियावर कधीही वैयक्तिक किंवा गोपनीय तपशील शेअर करू नका.

logo
marathi.freepressjournal.in