बोडो लिटरेचर फेस्टिवल: एक बहुभाषिक एहसास

अलीकडेच ‘बोडो लिटरेचर फेस्टिवल’ नवी मुंबईत संपन्न झालं. आसामी कवींबरोबरच प्रज्ञा दया पवार आणि संकेत म्हात्रे हे दोन मराठी भाषिक कवीही या महोत्सवात उपस्थित होते. आसामी शब्दांबरोबरच मराठी शब्दही तिथे उच्चारले गेले. २१ मार्चच्या जागतिक काव्यदिनानिमित्त हा बहुभाषिक काव्यसंवाद.
बोडो लिटरेचर फेस्टिवल: एक बहुभाषिक एहसास
Published on

- रसास्वाद

- संकेत म्हात्रे

अलीकडेच ‘बोडो लिटरेचर फेस्टिवल’ नवी मुंबईत संपन्न झालं. आसामी कवींबरोबरच प्रज्ञा दया पवार आणि संकेत म्हात्रे हे दोन मराठी भाषिक कवीही या महोत्सवात उपस्थित होते. आसामी शब्दांबरोबरच मराठी शब्दही तिथे उच्चारले गेले. २१ मार्चच्या जागतिक काव्यदिनानिमित्त हा बहुभाषिक काव्यसंवाद.

तसा माझा आसामशी फार जुना संबंध आहे. कोलकाताच्या एका राष्ट्रीय संमेलनात दिब्रुगडचे (उत्तर आसामच्या एका शहरातले) रणजित दत्ता नावाचे कवी आणि अनुवादक भेटले आणि तिथून आसामशी एक नवे मैत्र जुळले. लिडो नावाच्या एका छोट्या गावात दरवर्षी एक बहुभाषिक संमेलन भरवलं जातं. मुळात लिडो हे पूर्वेकडचं शेवटचं रेल्वेचं स्टेशन. तीथवर जगातिक कविता पोहोचते याचं मला फार कौतुक वाटतं. गंमत म्हणजे हे संमेलन तिथली लोकं मिळून भरवतात. कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक संस्था यात नसतात. त्यामुळे कुठेही आखीव-रेखीव स्टेज नसते किंवा सुसज्ज ऑडिटोरियम नसतं. सर्वत्र केवळ निसर्गाचा विचारमंच असतो. सगळे कवितावाचनाचे कार्यक्रम शेतात, जंगलात किंवा कुणाच्या घरी, कधी गच्चीत किंवा जुन्या शाळेत होतात. या कार्यक्रमाला तिथले स्थानिक कवी तर असतातच, पण त्याचबरोबर अकादमी प्राप्त कवी आणि लेखकसुद्धा आवर्जून हजेरी लावतात. या संमेलनात माझी ओळख प्रणय फुकान आणि नीलिम कुमार यांच्याशी झाली. दोन्ही साहित्य अकादमी प्राप्त कवी. पण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात तिथल्या हवापाण्याचा एक वेगळा एहसास जाणवतो.

आपल्या आवडत्या कवीशी बोलण्यासाठी आसामी बांधवांची आतुरता, चेहऱ्यावर झळकणारं प्रेम आणि आपुलकी फार भावणारी असते. बऱ्याचदा भाषा कळत नसतानाही कवितेचा गाभा किंवा अर्थ कळल्यावर त्यांचा चेहरा मोगऱ्याप्रमाणे फुलतो. त्यांच्या साध्या सुध्या हसण्यातही खूप मोठी, सखोल दाद दडलेली असते. हे विलोभनीय सुख मोठ्या स्टेजवर मिळत नाही. हे असं निखळ सुख निसर्गाच्या कुशीत रमणाऱ्या लोकांमध्येच फार भरभरून मिळतं.

मला पुन्हा हाच एहसास अलीकडेच झालेल्या ‘बोडो लिटरेचर फेस्टिवल’मध्ये अनुभवता आला. बोडो साहित्य हे मौखिकतेमधून आलंय. त्यांच्या लिखित साहित्याला जेमतेम १००वर्षांचा इतिहास आहे, मात्र तरीही ते अत्यंत सशक्त आहे आणि मनस्वी आहे.

हा साहित्य उत्सव नवी मुंबईच्या राजस्थान भवनमध्ये भरला होता. कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र बासुमातारी यांनी साहित्य उत्सवाची सुरुवातच ‘मराठी-आसामी काव्य संमेलना’ने केली. या कवी संमेलनामध्ये त्यांचे बैद्यनाथ बसुमतारी, ख्रॉमशार बसुमतारी, बिनोद कुमार ब्रह्मा, अंजन चंद्र बारो, देवेंद्रजीत बसुमतारी (बोडो साहित्यिक) यांची उपस्थिती होती, तर मराठीमधून डॉ. प्रज्ञा दया पवार आणि मी, मराठी भाषेचं प्रतिनिधित्व करत होतो. कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी पुस्तक प्रकाशनापासून केली. मग राजेंद्र यांनी कवी संमेलनाची सुरुवात आमच्यापासून केली. पुन्हा समोर तसेच चेहरे. मराठी कळत नसतानाही कान देऊन ऐकणारे. मनापासून पण हळुवार आवाजात बोलणारी माणसं समोर बसली होती. मी एक इंग्रजी कविता वाचली आणि शेवट ‘तिथे भेटूया, मित्रा’ या कवितेने केला.

“जिथे अजूनही शेक्सपिअर

शेवटचा अंक लिहितोच आहे,

जिथे तुकोबा कीर्तनात मग्न आहे,

जिथे मॉनेट आपली

फुलांची बाग सजवतोय,

जिथे न्यूटन झाडाखाली बसलाय

आकाशाकडे टक लावून,

तिथे भेटूया, मित्रा...”

या कवितेचा हिंदी अनुवाद जमेल तसा लोकांपुढे ठेवला तर सगळ्यांनीच जोरदार टाळ्या वाजवून कवितेचं स्वागत केलं.

डॉ. प्रज्ञा दया पवारांनी त्यांच्या ‘मुक्ती’, ‘मॉलने ओसंडून गच्च वाहणाऱ्या’ आणि ‘शंबूका’ या तीन कविता आणि त्यांचे हिंदी आणि इंग्रजी अनुवाद वाचले. ‘मुक्ती’ कवितेच्या या अर्थगर्भ ओळी पहा,

“आता कागदच म्हणाला,

नाही उमटवून घेत जा तुझं काहीच

तडफड

मला नाही फुटायचा पाझर कधीच

मुक्तीचा एहसास,

इतक्या सहजासहजी?

हात्तिच्या एवढंच ना

मी तर पाण्यावरही लिहेन

वाहत्या ज्वाळेवरही रेखेन ठिणग्या

तुला नाही अंदाज माझ्या बोटांचा, हातांचा

मी थेट देईन

तो हजारोंच्या हातात

फुटतील त्याला करोडो सळसळत्या फांद्या

अंगभर धुमसणाऱ्या

अश्रूंच्या वेदनेच्या अपमानबोधाच्या

निळ्याभोर आकाशाकडे,

झेपावणाऱ्या विद्रोहाच्या...”

कवितेला लोकांनी भरभरून दाद दिली. मुळात तिन्ही कविता भारावून टाकणाऱ्या आहेत.

बैद्यनाथ बसुमतारी यांनी 'सारं काही ठीक आहे' ही कविता वाचली. आशय साधा पण काळजाला भिडणारा. आपण बऱ्याचदा ‘सगळं ठीक’ असं म्हणून बऱ्याच आतल्या गोष्टी बोलत नाही. कारण जर ‘ठीक नाहीए’ असं जर बोललो तर लोकं प्रश्न विचारतील. म्हणून आपण सर्रास ‘आय एम फाइन’ असं म्हणतो. पण आपण आहोत का बरे? सगळे काही आलबेल आहे का? आणि आपण या प्रश्नापासून इतके का पळतो, हा प्रश्न आपण स्वत:ला विचारायला हवा.

कविता ऐकताना कवितेची मूळ व्यथा आणि त्यामागचा आशय आपल्याला माणूस म्हणून आणि कवी म्हणून समृद्ध करेलच. पण असे बहुभाषिक कार्यक्रम होणं, अनुवाद होणं हे आज कधी नव्हे इतकं गरजेचं आहे. माणसा-माणसाला जोडण्यासाठी. कवितेचा आणि साहित्याचा दुवा पुढे नेण्यासाठी.

कवी आणि साहित्याचे आस्वादक.

logo
marathi.freepressjournal.in