बालगृहातील मुलामुलींचा आधारवड

आजची दुर्गा- सूर्जा : आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर बालगृहाने आधार दिला अन् त्यानंतर उच्च शिक्षणाच्या पायऱ्या चढत परदेशात शिष्यवृत्ती संपादन करून अनाथांच्या संघर्षाचा बुलंद आवाजच नव्हे, तर बालगृहातील मुलामुलींचा आधारवड बनलेली सूर्जा आणि तिची जीवनकहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
आजची दुर्गा- सूर्जा
आजची दुर्गा- सूर्जा
Published on

गायत्री पाठक-पटवर्धन/पुणे

आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर बालगृहाने आधार दिला अन् त्यानंतर उच्च शिक्षणाच्या पायऱ्या चढत परदेशात शिष्यवृत्ती संपादन करून अनाथांच्या संघर्षाचा बुलंद आवाजच नव्हे, तर बालगृहातील मुलामुलींचा आधारवड बनलेली सूर्जा आणि तिची जीवनकहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

उत्तर प्रदेशातील गोंडा या छोट्या शहरात सूर्जाचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. वडील माळी, आई गृहिणी. लहानपणीच आईवडील वारल्यानंतर काही काळ सूर्जा व तिचा भाऊ त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे राहिले. तिथे अपार कष्ट आणि सतत अपमान सहन करावा लागला. एक दिवस सूर्जा आणि तिचा भाऊ रोहन नातेवाईकांच्या घरातून पळून दिल्लीला गेले. दिल्लीला गेल्यावर कुठे राहायचे, काय करायचे, काय खायचे हे काहीच माहीत नव्हते. सूर्जा बारा वर्षांची होती. जेव्हा ती दिल्लीला आली. तिथे काही दिवस दोन्ही भावंडांची उपासमार झाली. त्यांची गाठ पुढे एका बालकल्याण अधिकाऱ्यांशी पडली. त्यांनी दोन्ही भावंडांना वेगवेगळ्या बालगृहांत ठेवले. आठवड्यातून एकदाच आपल्या भावाची भेट सूर्जा घेत होती. दोघांनाही एकमेकांचा आधार ही त्यांच्या जगण्याची प्रेरणा होती. बालगृहात सूर्जाचे शिक्षण पुन्हा सुरु झाले. एका शिक्षिकेच्या प्रोत्साहनामुळे ती अभ्यासात चमकली. पुढे आयुष्यात खूप मोठे व्हायचे स्वप्न ती पाहू लागली. बालगृहात १८ व्या वर्षानंतर बालगृहाच्याच 'आफ्टरकेअर’ योजनेचा आधार घेत तिने पदवी संपादन केली. पुढे सूर्जाला तिच्याच बालगृहातील एका मैत्रिणींचा आधार मिळाला आणि ती त्यांच्यासोबत रूम घेऊन राहू लागली. तिने भावाचे आजारपण व नोकरी अशी दुहेरी कसरत करीत परदेशात पूर्ण शिष्यवृत्ती मिळवून पुढील शिक्षण घेतले. तिथे तिने जगभरातील बालगृहातून बाहेर पडलेल्या मुलामुलींशी संपर्क साधला आणि त्यांच्या कल्याणासाठी वाहून घेतले.

पत्रकार होण्याचे स्वप्न पाहत तिने पदवी शिक्षण पूर्ण करून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. एका न्यूज चॅनेलमध्ये पत्रकार म्हणून नोकरी मिळवली. आपल्या पगारातील काही पैसे साठवून सूर्जाने स्वतःचे एक छोटेखानी ‘विंग्ज ऑफ केअर’ नावाचा ब्लॉग सुरू केला. त्या माध्यमातून तिने तिच्यासारख्या अनेक मुलामुलींच्या संघर्षाला वाचा फोडली. त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले.

logo
marathi.freepressjournal.in