मसाज साजूक तुपाचा! त्वचेला होतात खूप फायदे; पण, 'ही' काळजी घ्या
त्वचा डागरहित आणि निरोगी असेल तर सौंदर्य वाढते. मात्र आजकाल प्रत्येकजण त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असल्याचे दिसते. खरे पाहता बाजारात अनेक उत्पादने आहेत, परंतु काही त्वचेला शोभत नाहीत तर काही खूप महाग असतात. अशा परिस्थितीत प्रत्येक घरात सहज उपलब्ध असणारे साजूक तूप वापरून आपण त्वचेची उत्तम काळजी घेऊ शकतो. चला तर मग, तुपामुळे त्वचेला कोणते फायदे होतात हे जाणून घेऊ या -
साजूक तुपामध्ये ओमेगा-३ भरपूर असल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊ शकतात. याचा वापर केल्याने तुमच्या त्वचेच्या छिद्रांमधला टिकून राहतो आणि बारीक रेषा कमी होतात.
साजूक तूप रोज चेहऱ्यावर लावल्याने पिगमेंटेशनही कमी होऊ शकते. त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असल्याने निस्तेज त्वचेपासून सुटका होऊ शकते.
चक्राकार पद्धतीने आणि एकसारख्या गतीने तुपाने चेहऱ्याला मसाज केला तर त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. एकदा हे साधले की चेहऱ्याची रिपेअरिंग पॉवर वाढते आणि त्वचेवर एक वेगळीच चमक पाहायला मिळते.
त्वचा कोरडी असेल तर चेहऱ्यासाठी तुपाचा वापर अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. तूप त्वचेला आतून पोषण देऊन सुधारण्याचे काम करते.
चेहऱ्यावर तुपाचा वापर केल्याने त्वचेची आर्द्रता टिकून राहते. सहाजिकच तुम्हाला अँटी-एजिंगमध्ये याची मदत होते. अँटी-एजिंगचे फायदे हवे असतील तर रात्री झोपताना चेहऱ्यावर तुपाने मसाज करू शकता.
ही काळजी घ्या
त्वचेची काळजी घेण्यासाठी तूप वापरण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. त्वचा तेलकट असेल तर याचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. कारण तुपाचा अधिक वापर त्वचेला हानी पोहोचवू शकतो. यामुळे मुरमांचा त्रास वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच चेहऱ्यावर तुपाचा वापर फक्त कोरडी त्वचा असलेल्या महिलांसाठीच योग्य आहे. याशिवाय, महत्त्वाची बाब म्हणजे रात्री तुपाने मसाज केला असल्यास सकाळी चांगल्या फोमिंग फेसवॉशने चेहरा धुवायला हवा. कारण त्वचेला रात्री लावलेले तूप योग्य प्रकारे स्वच्छ होणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा त्वचेवरील छिद्र ब्लॉक होतात. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.